Breaking News

लुटीची एक लाख ४ हजारांची रक्कम हस्तगत,चोवीस तासांत चौघांनाही अटक

An amount of 1 lakh 4 thousand loot was seized, four people were arrested within 24 hours

    सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ - एका औषध कंपनीमध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांनी आपल्या इतर दोन सहकाऱ्यांच्या मदतीने लाखाची रोकड लुटल्याची धक्कादायक बाब भुईंज पोलिसांच्या तपासात उघड झाली. अवघ्या चोवीस तासांत भुईंज पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावून चौघांनाही अटक केली. त्यांच्याकडून लुटीची एक लाख ४ हजारांची रक्कम हस्तगत करण्यात आली.

    राहुल अंकुश गोळे (वय २६), ओमकार रमेश गोळे (वय १८), अभिजित अंकुश गोळे (वय ३४, सर्व रा. जानकर कॉलनी, मंगळवार पेठ, सातारा), मयूर आनंदराव किर्दत (वय ३२, रा. करंजे पेठ, सातारा) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.

    याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आकाश दिलीप बोडके (वय २१, रा. महागाव, ता. सातारा) राहुल गोळे आणि मयूर किर्दत हे तिघे एकाच औषध वितरण करणाऱ्या कंपनीमध्ये काम करतात. या तिघांकडे औषध वितरीत केल्यानंतर त्याचे पैसे वसूल करण्याचे काम होते. ३० नोव्हेंबर रोजी हे तिघे औषधांचा टेम्पो घेऊन वाई ते पाचवड मार्गे निघाले. वाटेत आसले गावाजवळ रस्त्याच्याकडेला टेम्पो थांबवून दारू पिण्यासाठी शेतात गेले. त्यावेळी अज्ञात चोरट्याने गाडीची काच फोडून पिशवीतील १ लाख ४ हजारांची रोकड होतोहात गायब केली.

    याबाबत भुईंज पोलिस ठाण्यात आकाश बोडके याने फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्ने यांनी या प्रकरणाचा तातडीने तपास सुरू केला. यातील फिर्यादी आकाश आणि राहूल गोळे, मयूर किर्दची त्यांनी कसून चौकशी केली. त्यावेळी तिघांच्याही बोलण्यात विसंगत आढळून आली. त्यामुळे इथे काही तरी काळे बेरे आहे, याचा दाट संशय पोलिसांना आला.

    पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन त्यांची चौकशी केली असता हा कट मयूर किर्दत आणि राहुल गोळे या दोघांनी रचला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. राहुल हा टेम्पो चालक म्हणून काम करत होता. तर मयूर हा शेजारी बसून पैशाचे व्यवहार सांभाळत होता. या दोघांनी ओमकार गोळे आणि अभिजित गोळे यांना बोलावून घेऊन कट तडीस नेला. मात्र, पोलिसांनी कौशल्याने हा गुन्हा अवघ्या चोवीस तासांत उघडकीस आणला.
 

No comments