नटराज मंदिराचा वार्षिक रथोत्सव यावर्षी दि.26 डिसेंबर रोजी
सातारा - येथील पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग नजिकच्या कृष्णा नगर परिसरातील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात वार्षिक रथोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे .
श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात नटराज व शिवकामसुंदरी देवी यांच्या कृपेने आणि श्रीकांची कामकोटी पिठाचे महास्वामी परमपूज्य शंकराचार्य श्री श्री चंद्रशेखरेन्द्र सरस्वती स्वामी तसेच परमपूज्य श्री श्री जयेंद्र सरस्वती व परमपूज्य श्री शंकर विजयेंद्र सरस्वती यांचे पूर्ण अनुग्रह आणि शुभाशीर्वादाने नटराज मंदिरातील सर्व देवतांचा वार्षिक उत्सव शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर ते बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 पर्यंत संपन्न होत आहे .
या कार्यक्रमातील प्रमुख असा रथ पूजन व रथ प्रस्थानाचा शुभारंभ नटराज मंदिर येथे मंगळवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी आठ ते नऊ या वेळेत होणार आहे. सातारा येथील प्रांताधिकारी सुधाकर साहेबराव भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी तहसीलदार सौ . मीनल भोसले यांच्या हस्तेस्ते तसेच सातारा येथील ज्येष्ठ उद्योजक आणि मुथा ग्रुप कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर अजित मुथा व त्यांच्या सुविध्य पत्नी सौ. प्रमिला मुथा यांच्या शुभहस्ते हा रथ पूजन सोहळा होणार आहे .
दरम्यान वार्षिक रथोत्सवानिमित्त नटराज मंदिरात शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता ध्वजारोहण व प्रधान संकल्प आयोजित करणेत आला आहे. त्यानंतर शनिवार दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता पुण्याहवाचन व गणपती होम ,नवग्रह होम तसेच सायंकाळी सहा वाजता श्री राधा व श्रीकृष्ण या देवतेंचा लग्न सोहळा अर्थात कल्याण उत्सव संपन्न होणार आहे .
रविवार दिनांक 24 डिसेंबर २०२३ रोजी सकाळी सहा ते दुपारी बारा या वेळेत श्री गणपती होम, घटस्थापना, मंदिरातील सर्व देवतांचे मूलमंत्र जप , होम , व आरती होणार आहे सोमवारी 25 डिसेंबर रोजी सकाळी सहा ते दुपारी बारा या वेळेत श्री गणपती होम घटस्थापना मंदिरातील सर्व देवतांना मूलमंत्र जप ,होम , आरती होऊन दुपारी तीन ते सहा या वेळेत श्री महागणपती उत्सव आणि दीपोत्सव मंदिरातच्या प्रांगणात संपन्न होणार आहे .
मंगळवार दिनांक 26 डिसेंबर रोजी या उत्सवाचा प्रमुख दिवस असून पहाटे पाच वाजता श्री गणपती होम होऊन मूर्तीचे यात्रा दान म्हणजेच उत्सव मूर्तींच्या यात्रेंचा आरंभ होणार आहे. सकाळी आठ ते नऊ या वेळेत रथ पूजन करून प्रस्थान होऊन रथ यात्रा नटराज मंदिर येथून जिल्हा परिषद अध्यक्ष बंगला ,श्री साई मंदिर गोडोली ,पवई नाका ,नगरपालिका चौक ,आनंदवाडी दत्त मंदिर मार्गे , देवी चौक, राजवाडा तसेच मोती चौक ,शेटे चौक, पोलीस मुख्यालय, पवई नाका मार्गे श्री कुबेर गणपती मंदिर ,जिल्हा पोलीसप्रमुख निवासस्थान व सर्किट हाऊस मार्गे पुन्हा नटराज मंदिर येथे येणार आहे. सायंकाळी हा रथ संपूर्ण सातारा शहरातून मिरवणुकीनंतर पुन्हा मंदिर परिसरात येऊन तेथे भक्तांच्या उपस्थितीत महामंगल आरती व प्रसाद वितरण होणार आहे.
बुधवार दिनांक 27 डिसेंबर रोजी पहाटे पाच ते दुपारी बारा या वेळेत श्री गणपती होम तसेच पुणे येथील श्री राधाकृष्ण शास्त्री मेमोरियल ट्रस्ट यांच्यावतीने श्री नटराज देवास महाअभिषेक, लघुरुद्र व शिवपार्वती कल्याण उत्सव अर्थात लग्न सोहळा संपन्न होऊन त्यानंतर महामंगल आरती व दुपारी एक ते तीन या वेळेत महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे . रथोत्सव चा व मंदिराचा सर्व खर्च जनता जनार्दनाच्या देणग्यांमधून केला जातो, सर्वांनी या धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच तन -मन आणि धन याद्वारे यात सहभागी होऊन आनंद वृद्धिंगत करावा असे आवाहन नटराज मंदिर ट्रस्टचे कार्याध्यक्ष रमेश शानभाग तसेच रथोत्सव सेवा समितीच्या सर्व सदस्यांनी केले आहे.
No comments