Breaking News

केंद्र शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ द्यावा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Central government schemes should benefit maximum beneficiaries - Collector Jitendra Dudi

    सातारा दि. 8 : केंद्र शासनाच्या योजनांचा सर्वसामान्य लाभार्थ्यांना लाभ मिळावा या मुख्य उद्देशाने विकसित भारत यात्रा सुरू झाली आहे; यात्रेचा उद्देश सफल होण्याच्या दृष्टीने सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

    जिल्हाधिकारी कार्यालयात विकसित भारत संकल्प यात्रा आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

    जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, संकल्प यात्रेच्या निमित्ताने विविध योजनांची माहिती सांगणारे चित्ररथ गावांमधे जनजागृती करत आहेत. कार्यक्रमाच्या दिवशी त्या गावात आरोग्य शिबीराचे आयोजन, आयुष्यमान भारत योजना कार्ड तसेच विविध दाखल्यांचे वाटप करावे. या यात्रेनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये लोकप्रतिनिधीसह महिलांचा सहभाग घ्यावा.

    विकसित भारत संकल्प यात्रा जाणाऱ्या गावांमध्ये तेथे बँकांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ द्यावा. जिल्हा पुरवठा विभागाने स्टॉलची उभारणी करून तेथून शिधापत्रिका व उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ द्यावा. गावातील प्रतिभावान महिला, गुणवंत विद्यार्थी व राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व केलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात यावा.

    विकसित भारत संकल्प यात्रा जिल्ह्यात यशस्वी होण्यासाठी तयार केलेल्या आराखड्यानुसार तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी काम करावे. केंद्र शासनाच्या योजनांचा सर्वसामान्य लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे हा यात्रेचा उद्देश आहे त्यानुसार गावातील जास्तीत जास्त नागरिकांना केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिले.

    विकसित भारत संकल्प यात्रा जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांचा समन्वय अधिक महत्वाचा ठरणार आहे. यात्रेच्या निमित्ताने ग्रामीण भागातील नागरिकांना विविध योजनांचा लाभ देता येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.खिलारी यांनी यावेळी सांगितले.

No comments