Breaking News

आ. गोपीचंद पडळकर यांच्यावरील चप्पल फेकीच्या निषेधार्थ फलटण येथे रास्तारोको

come Roadblock at Phaltan to protest the slapping of slippers on Gopichand Padalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ११ - इंदापूर येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर करण्यात आलेल्या चप्पल फेकीच्या निषेधार्थ सकल ओबीसी समाजाच्यावतीने आज क्रांतिसिंह नाना पाटील चौक, फलटण येथे रास्तारोको करण्यात आला. यावेळी ओबीसी समाजाच्या नेतृत्वाबाबत जर गैरप्रकार झाले किंवा सोशल मीडियावर उलटसुलट पोस्ट व्हायरल करण्यात आल्या, तर त्याच पद्धतीने व ताकतीने उत्तर दिले जाईल असा इशारा ओबीसी समाजच्यावतीने देण्यात आला आहे.

    आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबाबत इंदापूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज ओबीसी समाजाच्यावतीने फलटण बंदचा इशारा देण्यात आला होता, मात्र दि. ९ ते १४ डिसेंबर या कालावधीमध्ये फलटणची राम यात्रा आहे. या निमित्ताने भाविक व व्यावसायिक, दुकानदार मोठ्या प्रमाणात फलटण शहरात येत असतात त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आज पुकारलेला बंद मागे घेण्यात यावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आल्याने, आजचा बंद स्थगित करून, रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

    आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे रास्ता रोको आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी पुणे रस्ता अडवल्याने या रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या भावनाही व्यक्त केल्या. रास्तारोको सुरू असताना ॲम्बुलन्स आल्याने तत्परतेने तीला मार्ग मोकळा करून देण्यात आला.

    यावेळी ओबीसी समाजच्यावतीने पोलीस उपअधीक्षक राहुल धस व तहसीलदार अभिजित जाधव यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनामध्ये फलटण शहर व ग्रामीण भागातील सकल ओबीसी समाज बांधव मोठया संख्येने सहभागी झाले होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

No comments