मुंजवडी येथून एकाचे अपहरण व पोकलॅन्ड मशीनची चोरी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१७ - मुंजवडी ता. फलटण गावाच्या हद्दीतून पोकलॅन्ड मशीनची चोरी करून, मालकाचेही अपहरण करून त्यास मारहाण केल्या प्रकरणी अकलुज, ता. माळशिरस येथील पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष पोपट साळुंखे रा. भवानीनगर, राजुरी, ता फलटण यांनी किशोर त्रिंबक इंगळे रा. विजयवाडी अकलुज, ता माळशिरस यांच्या मदतीने पोकलॅन्ड मशीन विकत घेतली होती. दि. ६/१२/२२०३ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पोकलॅन्ड मशीनचे काम मौजे ३६ फाटा मुंजवडी ता. फलटण येथे चालु होते. त्यावेळी तेथे किशोर त्रिंबक इंगळे व त्याचा भाऊ किरण त्रिंबक इंगळे दोन्ही रा. विजयवाडी अकलुज ता. फलटण जि सातारा. हे त्यांच्या इतर दोन ते तीन साथीदार यांना सोबत घेवुन, इनोव्हा कार क्रमांक एम.एच. ४५ ३०३०, स्विफ्ट कार क्रमांक एम.एच.४५ ए ५८७७ यामध्ये आले व त्यांनी त्यावेळी मशीनच्या हिशोबावरुन संतोष पोपट साळुंखे यांच्याशी वाद घातला. त्यांनी साळुंखे यांना हाताने व लाथाबुक्यांनी जबर मारहाण करुन किशोर याने त्यांचा मोबाईल काढून घेतला, व जबदरदस्तीने पकडून त्यांना इनोव्हा कार क्रमांक एम.एच.४५ ३०३० मध्ये बसविले. त्यानंतर त्यांनी ट्रेलरमध्ये पोकलॅन्ड मशीन भरली. व दोन्ही गाड्या मुंजवडी येथुन ३६ फटा मार्गे शिंदेवाडी, धर्मपुरी, मार्गे नातेपुते, निमगाव पाटी ता. माळशिरस येथे सुनसान जागेवर घेवुन गेले व तेथेही लाथाबुक्यांनी मारहाण केली असल्याची फिर्याद संतोष पोपट साळुंखे यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आरगडे हे करीत आहेत.
No comments