देशातल्या पहिल्या १० खासदारांमध्ये खा.रणजितसिंह ; राज्यात लोकसभेच्या ४५ जागा जिंकणार - चंद्रकांत बावनकुळे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ - बारामती - नांदेड सह राज्यात लोकसभेच्या ४५ जागा महायुती जिंकेल असा विश्वास व्यक्त करतानाच, माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे आणली आहेत. सर्वात जास्त विकास कामे आणणाऱ्या देशातील पहिल्या दहा खासदारांमध्ये निंबाळकर यांचा समावेश त्याची प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केले.
फलटण येथे पत्रकारांशी संवाद साधताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे बोलत होते. याप्रसंगी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर आमदार जयकुमार गोरे व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना चंद्रकांत बावनकुळे म्हणाले की, लोकसभा निवडणूक लढविण्याच्या जागांवरून महायुतीमध्ये कुठलाही किंतु परंतु नाही. राजकारणामध्ये जर तर ला काही अर्थ नसतो, तर जनता काय म्हणते याला अर्थ असतो. महाराष्ट्रातील जनता राहुल गांधी यांना मत द्यायला तयार नाही, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत द्यायला तयार आहे. त्यामुळे २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात महायुती एकतर्फी निवडून येईल असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
लोकसभेच्या जागांवर मित्र पक्षांनी दावा करणे हे युतीच्या राजकारणामध्ये होत असते, परंतु अद्याप केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने कुठले सीट कोणाला जाईल याबाबत चर्चा केली नाही. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार हे आमचे राज्यातील नेते व केंद्रीय नेतृत्व बसून याबाबत निर्णय घेतील व जो निर्णय होईल त्याबाबत कोणाच्याही मनामध्ये किंतु परंतु नसेल असे स्पष्ट करून बावनकुळे म्हणाले, कोण कुठे लढणार आहे हे आम्हाला महत्त्वाचं नाही आम्ही जिंकण्यासाठी लढणार आहोत. मित्र पक्षांच्या उमेदवारांपाठीमागे भाजप पूर्ण ताकतीने उभा राहील तर भाजपच्या उमेदवारांच्यामागे आमच्या महायुतीतील ११ पक्ष ताकतीने उभे राहतील त्यामुळे आम्ही राज्यात ४५ पेक्षा जास्त जागा जिंकू व त्यामध्ये नांदेडसह बारामतीचाही समावेश असेल असा दावाही बावनकुळे यांनी यावेळी केला. माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे आणली आहेत. सर्वात जास्त विकास कामे आणणाऱ्या देशातील पहिल्या दहा खासदारांमध्ये निंबाळकर यांचा समावेश आहे असे निदर्शनास आणून देत माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये बुथनिहाय 51 टक्के मते घेऊन महायुतीचा उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होईल असेही ते म्हणाले. खासदार उदयनराजे हे नियमितपणे माझ्याशी बोलत असतात त्यामुळे माझ्या व पक्षाबाबत त्यांच्या मनामध्ये कुठलीही नाराजी नाही असे सांगत तिकीट मागण्याचा अधिकार पक्षाच्या बूथ कार्यकर्त्यालाही भाजपमध्ये आहे. कारण तो पक्षाचे व समाजाचे काम करत असतो त्यामुळे ज्यावेळी पक्षाकडून उमेदवारीचा निर्णय होतो तेव्हा आमचे सर्व कार्यकर्ते कामाला लागतात असेही बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.
दुधाच्या दरवाढी बाबत बोलताना ते म्हणाले नोंदणीकृत दूध विक्रेत्यांना पाच रुपये दरवाढ मिळाली आहे. परंतु विना नोंदणीकृत खाजगी दूध विकणाऱ्या लोकांनाही दरवाढ मिळायला हवी. याबाबत आपले बोलणे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी झाले आहे ७५ टक्के लोकांना पाच रुपये दरवाढीचा फायदा होत नाही, तो व्हायला हवा. या प्रश्नी सरकार योग्य निर्णय घेईल मात्र त्यासाठी सरकारला थोडा वेळ द्यायला हवा अशी अपेक्षा व्यक्त करून आगामी काळातही भाजपच राज्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहील. आमच्या महायुतीतील पक्षही हातात हात घालून काम करतील व तेही पुढे जातील असे आपणास वाटत असल्याचे बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.
No comments