Breaking News

शरद पवार यांच्याच पाठीशी फलटण तालुका व सातारा जिल्हा ठामपणे उभा राहील - सुभाषराव शिंदे

Phaltan taluka and Satara district will remain firmly with Sharad Pawar - Subhash Rao Shinde

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  दि. ३ : महाराष्ट्राच्या भूमीला संतांच्या विचारांचा वारसा आहे तर सातारा जिल्ह्याला छ. शिवाजी महाराज, महात्मा फुले, क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण अश्या विभूतींच्या विचारांचा वारसा आहे, आणि तोच वारसा पुढे घेऊन वाटचाल करणाऱ्या शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याच पाठीशी फलटण तालुक्यातील जनता व सातारा जिल्हा ठामपणे उभा राहील असा विश्वास जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे यानी व्यक्त केला. 

    फलटण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बांधणी, तालुका कार्यकारिणी व विविध समित्यांची निवड यासाठी फलटण तालुक्यातील पक्ष कार्यकर्त्यांचा जाहिर मेळाव्याचे आयोजन फलटण येथे करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.

    महाराष्ट्रात सध्या तोडा-फोड, फूट पाडा, जातिजातींमध्ये तेढ निर्माण करा असे भयानक प्रकार सुरु आहेत, परंतू ही महाराष्ट्राची व जिल्ह्याची संस्कृती नाही. या परिस्थितीत शरद पवार व राष्ट्रवादी पक्षाच्या विचारधारनेतून नवीन पिढी व क्रांती घडविण्याची वेळ आता आली आहे असे स्पष्ट करून शिंदे म्हणाले, विपरीत राजकीय परिस्थितीतही वयाच्या ८२ व्या वर्षी तरुणाला लाजवेल आशा पद्धतीने पवार यांचे काम सुरू आहे. लोकप्रतिनिधी दुसरीकडे असले तरी सर्वसामान्य जनता मात्र शरद पवार यांच्या पाठीशी उभी असल्याचे चित्र सर्वत्र असून फलटण तालुकाही त्यास अपवाद नाही. फलटण तालुक्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेले नीरा-देवघर, धोम-बालकवडी, रेल्वे व औद्योगिक प्रकल्प, कारखानदारी यामध्ये पवार यांचे योगदान मोठे आहे व त्याची जाणीव सर्वसामान्य जनतेला आहे. 

    जनतेमुळे नेते निर्माण होतात, त्यामुळे आगामी काळात जनता मोठी की निवडून दिलेला नेता मोठा हे दाखवून देण्याची वेळ आली असून तालुक्यातील जनता शरद पवार यांच्या पाठीशी उभी राहून ते निश्चितपणे दाखवून देईल असा विश्वास सुभाषराव शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

    यावेळी रवींद्र बर्गे, प्रा. सुधीर इंगळे, माजी नगरसेवक तुकाराम गायकवाड, तानाजी जगताप आदींसह शहर व तालुक्यातील विविध गावांमधील शरद पवार याना मानणारे नागरीक, ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments