Breaking News

फलटण विधानसभा मतदार यादी अद्ययावत ; दि. ५ जानेवारी रोजी होणार प्रसिद्ध - प्रांताधिकारी सचिन ढोले

Phaltan Vidhan Sabha Electoral List Updated; To be announced on 5th January - District Magistrate Sachin Dhole

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१४ - : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २५५ फलटण (अ. जा.) विधानसभा मतदार संघातील मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाप्रमाणे दि. १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकास वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवक/युवती, तृतीय पंथी, नवविवाहिता यांच्या नावांचा समावेश, मयत अथवा स्थलांतरितांच्या नावांची वगळणी आणि अन्य आवश्यक दुरुस्त्यांसह अद्ययावत करण्यात येत असून दि. ५ जानेवारी रोजी अद्ययावत मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

    २५५ फलटण (अ. जा.) विधानसभा मतदार संघातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांना मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमानुसार राबविलेल्या विविध योजनांची माहिती देवून या मतदार यादी बाबत काही सूचना असतील तर त्या जाणून घेण्यासाठी  प्रांताधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत सचिन ढोले बोलत होते. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार श्रीमती बागवान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाषराव शिंदे, प्रा. भिमदेव बुरुंगले, भाऊसाहेब कापसे, भारतीय जनता पक्षाचे जयकुमार शिंदे, सागर अभंग, अमोल सस्ते, धनंजय साळुंखे पाटील, राजेश शिंदे, लतीफ तांबोळी, अ.भा. राष्ट्रीय काँग्रेसचे महेंद्र सुर्यवंशी बेडके, शिवसेनेचे नानासाहेब उर्फ पिंटू इवरे उपस्थित होते. 

    नव मतदार नोंदणी करताना महाविद्यालय आणि मतदार संघातील काही गावात आपण स्वतः जाऊन तसेच तहसीलदार व अन्य अधिकाऱ्यांनी मतदारांना याबाबत माहिती देवून त्यांच्या कडून आवश्यक फॉर्म भरुन घेतले आहेत. त्याचप्रमाणे दि. ३१ डिसेंबर २००५ पूर्वी जन्मलेल्या मुलांची माहिती रुग्णालयातून  किंवा ग्रामसेवक व नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडून घेऊन संबंधीत कुटुंबाकडून आवश्यक फॉर्म भरुन घेऊन सदर नावे मतदार यादीत समाविष्ट केली असल्याचे तसेच याच यंत्रणेकडून मयत मतदारांबाबत माहिती घेऊन त्यांची नावे वगळण्याची प्रक्रिया कुटुंबियांच्या माध्यमातून आवश्यक फॉर्म भरुन घेऊन पूर्ण करण्यात आल्याचे तसेच नव विवाहिता यांच्या नावांची वगळणी अथवा समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेत सुमारे २०० नावांबाबत कुटुंबियांकडून माहितीसह फॉर्म भरुन घेऊन ती प्रक्रिया पूर्ण केल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

    याशिवाय मतदार स्वतः तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत येऊन, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), व्होटर हेल्प लाईन द्वारे आणि राजकीय पक्षांचे मतदान केंद्र स्तरीय प्रतिनिधी (BLA) मार्फत चुकीची नावे दुरुस्त करणे, फोटो चुकीचे असतील अथवा खराब असतील तर ते बदलणे, मयत व्यक्तींची नावे वगळणे, पत्ता बदलला असेल तर त्याची दुरुस्ती आणि नवीन नावे समाविष्ट करण्याची प्रक्रिया फॉर्म नंबर ६, ७ व ८ समक्ष अथवा ऑन लाईन भरुन देवून पूर्ण करु शकत असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी निदर्शनास आणून दिले.

    या संपूर्ण प्रक्रिये नुसार आतापर्यंत फॉर्म नंबर ७ नुसार ९ हजार ८०५ नावे मतदार यादीतून वगळण्याची आणि  ९८५० नावे फॉर्म नंबर ६ नुसार समाविष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण करुन अद्ययावत मतदार यादी अंतीम प्रसिध्दी दि. ५ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. सदर वगळलेल्या व समाविष्ट केलेल्या मतदारांची माहिती आपणास उपलब्ध करुन देण्यात येत असून त्याबाबत आपण आवश्यक माहिती घेऊन त्याबाबत काही सूचना असतील, चुका असतील त्याबाबत कळविल्यास त्याप्रमाणे योग्य ती दुरुस्ती करुन घेण्याचे आश्वासन यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी  राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

    यावेळी उपस्थित राजकीय पक्ष पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्न व शंकांना समर्पक उत्तरे देवून प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी त्यांचे समाधान केले, आणि यानंतरही काही सूचना असतील तर त्या कराव्यात योग्य सूचना नुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवस पर्यंत आवश्यक दुरुस्ती करता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

No comments