सातारा जिल्ह्यात सव्वा लाख कुणबी नोंदी आढळल्या
सातारा : सातारा जिल्ह्यात प्रशासनाने राबवलेल्या कुणबी नोंदीच्या कार्यवाहीत आतापर्यंत सव्वा लाख नोंदी आढळल्या आहेत. यातील सर्वाधिक नोंदी पाटण, जावळी, सातारा तालुक्यात आढळल्या आहेत. त्यानुसार नागरिकांना कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयातून सुरू आहे; पण काही नागरिकांकडूनही कुणबी नोंदीचे त्यांच्याकडील कागदपत्रे प्रशासनाकडे सादर करत आहेत. त्यातून दाखले देताना मात्र, प्रशासनाची अडचण होत आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यभर विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत, तर मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला मराठा समाजाला आरक्षण जाहीर करण्याबाबत २४ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. या पार्श्वभूमीवर कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया शासनाने राज्यभर सुरू केली आहे; पण त्यासाठीच्या पुराव्यांचा शोध सुरू आहे. या पुराव्यांच्या आधारे त्या त्या गावातील मराठा समाजाला कुणबीचे दाखले दिले जात आहेत. त्यातून त्यांना ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाचा फायदा मिळत आहे.
जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या कुणबीच्या जुन्या नोंदींच्या प्रक्रियेत आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल सव्वा लाख नोंदी सापडल्या आहेत. मराठा कुणबी व कुणबी मराठा अशा नोंदी आहेत. यामध्ये १९४८ ते १९६७ तसेच १९४८ पूर्वीच्या नोंदीची तपासणी करण्यात आली आहे. यासाठी सर्व शासकीय विभागातील जुने दस्तावेज तपासणी केली आहे. यामध्ये पाटण, जावळी, सातारा तालुक्यांत सर्वाधिक नोंदी आढळल्या आहेत, तर उर्वरित तालुक्यातही नोंदी सापडल्या आहेत. यानुसार ज्यांच्या नावाचे पुरावे सापडतील, त्यांना दाखले देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
काही नागरिकांनी त्यांच्याकडे असलेल्या जुन्या दस्तावेजांत असलेल्या कुणबीच्या मोडी लिपीतील नोंदी असलेली कागदपत्रे प्रशासनाकडे सादर करत आहेत; पण या नोंदींची तपासणी केल्याशिवाय त्यांना दाखले दिले जात नाहीत.
No comments