ऑनलाइन कर्ज फसवणूक प्रकरणी श्रीमंत रघुनाथराजे यांच्या ठोस भूमिकेमुळे शेतकऱ्यांना दिलासा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.18 डिसेंबर - फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रातून शेतीविषयक साहित्य उधारीवर खरेदी केल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या नावावर फायनान्स कंपनीचे कर्ज लादून, त्यांना थेट वसुलीची नोटिस आल्यानंतर झालेल्या फसवणुकीबाबत शेतकऱ्यांनी कृषि उत्पन्न बाजार समिती, फलटणच्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शेतकरी समस्या निवारण कक्षाकडे रितसर तक्रार दाखल केल्यानंतर समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी लक्ष घालून फायनान्स कंपनी, कृषी सेवा केंद्र, शासकीय अधिकार व शेतकरी यांची संयुक्त बैठक घेऊन, झालेल्या फसवणुकी बाबत चौकशी करून, फायनान्स कंपनी व कृषि सेवा केंद्र यांनी तात्काळ शेतकऱ्यांचे पेमेंट जमा न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे जाहीर करताच, सर्व संबंधित कृषि सेवा केंद्रानी नोटीशीमध्ये नमूद असलेली जास्तीची रक्कम, त्यावरील दंड आणि व्याज सबंधित फायनान्स कंपनीकडे तात्काळ जमा केली.
केअर इंडिया फिनवेस्ट लि. फरिदाबाद, हरियाणा व फलटण तालुक्यातील काही कृषि सेवा केंद्राचे डिलर्स यांच्या माध्यमातुन उधारी, निविष्ठा खरेदी विक्रीचे लक्षांक पुर्ण करणे, शेतकऱ्यांची संमती न घेता ऑनलाईन कर्जपुरवठा करणे या सर्व बाबींबद्दल फलटण तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी कृषि उत्पन्न बाजार समिती, फलटणच्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शेतकरी समस्या निवारण कक्षाकडे रितसर तक्रार दाखल केली होती. याबाबत फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी तातडीने फलटण तालुक्यातील सर्व डिलर्स, पंचायत समितीचा गुण नियंत्रण विभाग व तालुका कृषि अधिकारी, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव, सहायक निबंधक, सह,संस्था,फलटण, तक्रारदार शेतकरी, फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक बोलाविणेचे निर्देश दिले होते.
शेतकऱ्यांचे म्हणणे व कृषि सेवा केंद्राचे डिलर यांचे म्हणणे ऐकुन घेतल्यानंतर आणि शेतकऱ्यांना आलेल्या सिटी सिव्हील अँड सेशन कोर्ट मुंबई-३२ च्या नोटीसाची खातरजमा केलेअंती शेतकऱ्यांची खुप मोठ्या प्रमाणावर फसवणुक झाली असल्याचे समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणुन दिले होते.
तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणुक झाली असुन याबाबतीत फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शेतकरी समस्या निवारण कक्षाने योग्य ती दखल घेत फायनान्स कंपनी व कृषि सेवा केंद्र यांनी तात्काळ शेतकऱ्यांचे पेमेंट जमा न केल्यास कडक कायदेशीर कारवाई करणार असल्याचे समजताच सर्व संबंधित कृषि सेवा केंद्रानी नोटीशीमध्ये नमूद असलेली जास्तीची रक्कम,त्यावरील दंड आणि व्याज सबंधित फायनान्स कंपनीकडे तात्काळ जमा केले असल्याची माहिती समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
शेतकऱ्यांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्यांची सोडवणूक करुन शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या हेतूने फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शेतकरी समस्या निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली असून वेळोवेळी प्राप्त तक्रारीवर दखल घेत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम फलटण बाजार समिती करीत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी दिली.
No comments