मराठा व धनगर समाजाला आरक्षण द्यावे ; खा. रणजितसिंह यांची लोकसभेत मागणी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१४ - महाराष्ट्रात मराठा समाजाची लोकसंख्या ३३ टक्के आहे. सध्या मराठा समाज अडचणीत सापडला आहे, त्यामुळे मराठा समाजाला तसेच धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी लोकसभा अधिवेशनात खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांनी केली आहे.
लोकसभेत प्रश्न उपस्थित करताना खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, २५ वर्षांपूर्वी मराठा समाजाच्या एका कुटुंबाकडे २५ एकर जमीन होती. आता ती दोन एकरवर आली आहे. यामुळे कुटुंब चालविताना अडचणी येत आहेत. सध्या तरुणांना नोकरी हवी असेल तर उच्च शिक्षण घेणे गरजेचे आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशाची आवश्यकता आहे. मात्र अनेक कुटुंबाकडे पैसा नसल्याने शिक्षणापासून तरुणांना वंचित रहावे लागत आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाची संख्या ३३ टक्के आहे. यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे तसेच महाराष्ट्रातील धनगर व धनगड ही एकच जात आहे. मात्र महाराष्ट्राबाहेर धनगर समाजाला आरक्षण दिले गेले आहे. परंतु महाराष्ट्रात मिळत नाही, तरी या समाजाला आरक्षण मिळावे, महाराष्ट्रात मराठा व धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी खास बैठक घेण्यात यावी, अशी मागणी खासदार नाईक-निंबाळकर यांनी लोकसभेत केली आहे. आता केंद्र सरकार कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
No comments