फलटण येथे आरटीओ ऑफिस सुरू होणार - खा. रणजितसिह नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भेट घेऊन, फलटण येथे परिवहन कार्यालय सुरू व्हावे अशी मागणी केली, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात यावी असे आदेश संबंधित विभागास दिले असल्याची माहिती खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
फलटण येथे परिवहन कार्यालय सुरू झाल्यास फलटण मधील सर्वसामान्य लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी व इतर कामासाठी साताराला जावे लागणार नाही. फलटणच्या शेवटच्या टोकापासून हे अंतर कमीत कमी १०० किलोमीटर आहे . त्यामुळे लोकांचे खुप हाल होत आहे व आर्थिक त्रास सोसावा लागत आहे. फलटणला परिवहन कार्यालय झाल्यास फलटणमधील सर्वसामान्य लोकांची सोय होणार आहे, यामुळे शहरातली युवक व्यापारी यांचा दिवस वाया जाणार नाही व खर्चामध्येही कपात होईल तसेच स्वतंत्र आरटीओ नंबर फलटण तालुक्याला मिळेल.
खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री महोदय यांना दिलेल्या पत्रामध्ये आरटीओ कार्यालयास सरकारी जागा उपलब्ध व्हावी ही मागणी त्यामध्ये केलेली आहे. त्यासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे लवकरच प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू होण्यास अडचण राहणार नाही अशी माहिती खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
No comments