Breaking News

फलटण येथे महिला बचत गट उत्पादित वस्तूंची विक्री व प्रदर्शन

Sale and display of products produced by women's self-help groups at Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ११ -  महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा व फलटण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने,  नगर परिषद पार्किंग मैदान, फलटण येथे ४ दिवसीय महिला बचत गट उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.

    या प्रदर्शनात ७५ बचत गटांचे स्टॉल लावण्यात येणार आहे. यामध्ये विविध मसाले, पापड, पीठे, कडधान्य, लोणचे, सांडगे, कुरडई, शेवई, चकली, नानकेट, बिस्किटे, पिशव्या, पर्स,ज्यूट बॅग, कोल्हापुरी चप्पल, मातीची भांडी, लाकडी कलाकुसर, लोकरीच्या वस्तू, फ्रेम्स, इंद्रायणी तांदूळ, इमिटेशन ज्वेलरी, म्हसवडची घोंगडी, आयुर्वेदिक सौंदर्य प्रसादने,रेडीमेड कपडे, बांबूच्या वस्तू, बांगड्या, विविध चटण्या इत्यादी स्टाॅल ठेवण्यात येणार आहेत.

    फलटण नगरपरिषदेलगत असलेल्या वाहन तळावर मंगळवार दि. १२ ते शुक्रवार दि. १५ डिसेंबर या कालावधीत सकाळी १० ते रात्री १० या वेळेत हे प्रदर्शन पार पडणार आहे. प्रदर्शनाचा शुभारंभ प्रांत अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते व मुख्याधिकारी संजय गायकवाड   यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र चौधरी, बँक ऑफ महाराष्ट्र साताराचे योगेश पाटील, तहसीलदार अभिजित जाधव, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, तालुका पशुसवर्धन अधिकारी नंदकुमार फाळके, पोलिस निरीक्षक सुनिल शेळके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

    प्रदर्शनाच्या कालावधीत दररोज सायंकाळी विविध मनोरंजन व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. तरी शहरातील नागरिकांनी प्रदर्शनास  भेट देऊन महिला बचत गटांचा उत्साह वाढवावा असे आवाहन विजय डोके जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ यांनी केले आहे.

No comments