Breaking News

सातारा लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा आहे आणि आम्हीच या ठिकाणी लढणार - जयकुमार गोरे

Satara Lok Sabha Constituency belongs to BJP and we will fight here - Jayakumar Gore

    सातारा : 10 - पाच राज्यांच्या विधानसभांच्या निकालानंतर लोकसभेचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यातील विविध पक्षांकडून लोकसभा मतदारसंघांवर दावा करण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार यांनी कर्जत येथील अधिवेशनात सातारा लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघावर अजित पवारांनी दावा केल्यानंतर आता साताऱ्यातील लोकसभा मतदासंघ कोणाच्या वाट्याला जाणार यावरून चांगलच रण सुरू झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेच्यावतीनं पुरुषोत्तम जाधव यांनी या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. आता भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांनी आक्रमक होत सातारा लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा आहे आणि आम्हीच या ठिकाणी लढणार असा दावा केल्यामुळं महायुतीमध्ये मतदारसंघावरून नवा पेच निर्माण झाला आहे.

    भाजपानं गेल्या साडे तीन वर्षात या मतदासंघात मोठ्या ताकदीनं काम केल आहे. तसंच भाजप हा सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. यामुळं कोणी काहीही भूमिका मांडत असेल तरी हा मतदारसंघ कोणत्याही किमतीवर भाजपाकडंच राहिला पाहिजे, अशी भूमिका पक्ष श्रेष्ठींकडे मांडली आहे. आम्ही हा मतदारसंघ कोणत्याच परिस्थितीत सोडणार नसल्याचं सांगून जयकुमार गोरे यांनी थेट अजित पवारांना थेट आव्हान दिल्याचं पाहायला मिळत आहे.

    सातारा लोकसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील हे खासदार आहेत. भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या जागावाटपामध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. २००९ ला पुरुषोत्तम जाधव हे उमेदवार होते. त्यानंतर २०१४ हा मतदारसंघ आरपीआयला सोडण्यात आला. २०१९ च्या लोकसभेला हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेकडे आला, निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून शिवसेनेत आलेल्या नरेंद्र पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, नरेंद्र पाटील २०१९ ला पराभूत झाले. त्यानंतर पुन्हा त्यांनी शिवसेनेपासून अंतर राखलं आहे.

    २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या चिन्हावर उदयनराजे भोसले निवडणूक जिंकले होते. मात्र, सहा महिन्यात राजीनामा देत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून त्यांनी पोटनिवडणूक लढवली पण त्यांना अपयश आलं आणि श्रीनिवास पाटील विजयी झाले होते. आता हा मतदारसंघ महायुतीत कुणाकडे जाणार हे स्पष्ट झालेलं नाही. पण, महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे जाणार हे निश्चित आहे.

No comments