फलटणची श्रीराम रथयात्रा : श्रीरामाची नगर प्रदक्षिणा संपन्न
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१३ डिसेंबर - संस्थान काळापासून सुरु असणारी प्रभू श्रीराम रथोत्सव यात्रा यावर्षीही फलटणसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत परंपरागत पध्दतीने मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात पार पडली. नाईक-निंबाळकर राजघराण्यातील साध्वी श्रीमंत सगुणामाता आईसाहेब यांनी सुमारे २६० वर्षांपूर्वी रथयात्रेची सुरू केलेली परंपरा आजही परंपरागत पध्दतीने सुरू आहे.
श्री राम मंदिरापासून नगरप्रदक्षिणेसाठी निघालेल्या या रथाचे शिंपी गल्लीतून बारामती चौक मार्गे नगरपरिषद कार्यालया-समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आगमन झाले. त्यानंतर रथयात्रा ज्ञानेश्वर मंदिर, प. पू. गोविंद महाराज उपळेकर मंदिर, डेक्कन चौक, महात्मा फुले चौक, मारवाड पेठ मार्गाने बारस्कर चौक, रंगारी महादेव मंदिरापासून बाणगंगा नदीपात्र, मलठण भागातील सद्गुरू हरीबुवा मंदिरापासून फिरत सिमेंट रोड, छ.शिवाजी महाराज चौक, गजानन चौक या मार्गाने सायंकाळी पुन्हा श्रीराम मंदिरासमोरील रथखाण्यात पोहोचला.
दरम्यान, रथ प्रदक्षिणेच्या मार्गावर ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने आलेल्या अबालवृध्दांनी प्रभू श्रीरामाचे शहरात ठिकठिकाणी मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतले. शहरवासीयांनी रथमार्गावर सडा रांगोळ्या घालून प्रभू श्री रामाचे स्वागत केले. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी थांबून शहरवासीय आणि ग्रामीण भागातील तसेच परगावच्या भक्त मंडळींनी प्रभू श्री रामाचे दर्शन घेतले. या रथोत्सवासाठी बारामती, इंदापूर, पुरंदर, खंडाळा, माण, खटाव, कोरेगाव या तालुक्यातून भाविक मोठ्या संख्येने आले होते. नोकरी व्यवसायानिमित्त पुणे, मुंबई आणि अन्य शहरात असलेले येथील रहिवासीही आपल्या कुटुंबीयांसह रथयात्रेसाठी आणि प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी आले होते.
यावर्षी प्रथमच महिला बचत गटांच्या माध्यमातून सुमारे ४५ स्टॉल यात्रेत लावण्यात आले असून त्यामध्ये खाद्य पदार्थांसह नित्योपयोगी वस्तूंचे स्टॉल आहेत. या स्टॉल वर गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.
फलटण - शिंगणापूर रस्त्यावर उभारण्यात आलेल्या प्रशस्त श्रीमंत रामराजे मार्केट समोरील प्रशस्त जागेत दुतर्फा तसेच महावीर स्तंभापासून उमाजी नाईक चौक ते गजानन चौकापर्यंतच्या मार्गावर विविध प्रकारच्या वस्तूूंचे स्टॉल लागले आहेत, त्यामध्ये मेेवामिठाई, संसारोपयोगी वस्तू, सौंदर्य प्रसाधने, काचेच्या व प्लॅस्टिकच्या बांगड्या बेंटेक्स दागिणे आणि लहान मुलांच्या विविध प्रकारच्या खेळण्यांचा समावेश आहे. विविध प्रकारची करमणुकीची साधने व खेळ, उंच उंच पाळणे, रेल्वे, फिरती चक्रे आदी मनोरंजनाची व लहान मुलांचे आकर्षण ठरणारी साधनेही या यात्रेत दाखल झाली आहेत.रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त सगळीकडे नेमण्यात आला होता.
No comments