आर्थिक उत्पन्न जास्त असणाऱ्यांनी रेशनिंग योजनेतुन बाहेर पडावे - तहसीलदार ; सर्व्हे होणार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२१ - फलटण तालुक्यातील सुजाण नागरिकांना जाहीर आवाहन करणेत येते की, केंद्र व राज्य शासना तर्फे धान्य वितरण योजनेचा लाभ गरजू नागरीकांना देणेत येतो सुमारे 10 वर्षापूर्वी झालेल्या आर्थिक व सामाजिक सर्वेक्षणातील उत्पन्नाच्या आधारे त्या वेळेस या योजनेत अनेक शिधापत्रिका धारक हे धान्य मिळणेसाठीसाठी पात्र झालेले होते. आता इतक्या वर्षानंतर यापैकी अनेक शिधापत्रिका धारकाचे वार्षिक उत्पन्नात वाढ होऊन, त्यांचा आर्थिक स्तर उंचावलेला आहे. परंतु धान्य वाटप हे जुन्या वार्षिक उत्पन्नाचे आधारेच करणेत येत आहे. धान्याचा लाभ घेणारे लाभार्थी यांचेपैकी सरकारी/ निमसरकारी नोकरी, खाजगी नोकरी, पेन्शन धारक, व्यवसायिक, बागायतदार शेती अशा उत्पन्नाच्या स्त्रोताव्दारे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागा करिता ४४०००/- व शहरी भागा करिता रु.५९०००/- पेक्षा जास्त आहे, तसेच चार चाकी वाहनधारक, आयकर नोकरीकामी भरणारे लाभार्थी, ज्या कुटुंबातील व्यक्ती' परदेशात आहेत असे लाभार्थी धान्य मिळणेस नियमानुसार अपात्र आहेत, त्यांनी आपला लाभ तात्काळ सोडणे अपेक्षीत असल्याचे तहसीलदार अभिजित जाधव यांनी कळविले आहे.
या व्यतिरिक्त देखील काही स्वेच्छेने धान्य सोडणारे लाभार्थी असलेस या सर्वांनी विहीत नमुन्यातील फॉर्म संबंधीत तलाठी / ग्रामसेवक यांचेकडे सुपुर्द करावे. तसेच अपात्र असून लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी स्वतःहून अन्नधान्य योजनेतुन गिव इट अप चे फॉर्म जमा न केल्यास त्यांची पडताळणी तलाठी तथा ग्रामदक्षता समिती सचिव, ग्रामसेवक तथा ग्रामदक्षता समिती सदस्य संबंधित यांचे मार्फत करुन त्यांचे नाव लाभार्थी यादीतून वगळणेत येऊन त्यांचेवर आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई देखील करणेत येणार असल्याचे तहसीलदार अभिजित जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच ज्या अंत्योदय शिधापत्रिकेमध्ये फक्त १ अथवा २ सदस्य असतील त्यांची शिधापत्रिकाही प्राधान्य कुटुंबाच्या लाभार्थ्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहेत. तरी सध्या वर नमूद केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक आर्थिक उत्पन्न असलेल्या अथवा अन्य कारणाने अपात्र असलेल्या कार्डधारकांनी म्हणजेच अपात्र लाभार्थ्यांनी स्वेच्छेने धान्य योजनेतुन गिव इट अप फॉर्म भरून अन्नसुरक्षा योजनेतुन बाहेर पडावे, जेणे करुन खऱ्या गरजु लाभार्थ्यांना शिधावाटप योजनेचा लाभ देता येईल असे जाहीर आवाहन पुरवठा विभाग, तहसील कार्यालय फलटण यांचे तर्फे फलटण तालुक्यातील सर्व सुजाण नागरिकांना करणेत येत आहे.
Post Comment
No comments