Breaking News

अनुसूचित वर्गातील उद्योजकांकरिता इंटरप्रिनर डेव्हलपमेंट प्रोग्राम विषयी सातारा येथे कार्यशाळा संपन्न

A workshop on Entrepreneur Development Program for Scheduled Class Entrepreneurs was concluded at Satara

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ - दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज, सातारा चाप्टर यांच्यावतीने सातारा जिल्ह्यातील अनुसूचित वर्गातील उद्योजकांकरिता इंटरप्रिनर डेव्हलपमेंट प्रोग्राम विषयी हॉटेल प्रीती एक्झिक्यूटिव्ह, सातारा येथे कार्यशाळा घेण्यात आली.

    या कार्यशाळेत, दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजच्या वुमन विंगच्या राष्ट्रीय मार्गदर्शक श्रीमती सीमा कांबळे, वेस्टर्न इंडिया प्रेसिडेंट श्री अविनाश जगताप, नॅशनल कॉर्डिनेटर डिक्की नेक्स्ट-जेन श्रीमती मैत्रेयी कांबळे, महाराष्ट्र व्हाईस प्रेसिडेंट वूमन विंग श्रीमती निवेदिता कांबळे, सातारा चॅप्टर प्रमुख श्री प्रसन्न भिसे, कोअर कमिटी सदस्य श्री सचिन दिघोळकर, नॅशनल एससी-एसटी हब पुणे ऑफिसचे प्रमुख श्री रितेश रंगारी, जिल्हा उद्योग केंद्र सातारा यांच्या प्रोजेक्ट ऑफिसर श्रीमती शितल पाटील आणि दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजचे सदस्य हे उपस्थित होते.

    यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती सीमा कांबळे म्हणाल्या, सन २००५ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त भारत सरकारने कमिटी नियुक्त केली होती. कमिटीत बारा कॅबिनेट मंत्री, सहा नामवंत तज्ज्ञ त्यामध्ये माजी कुलगुरू नरेंद्र जाधव, भन्ते राहुल बोधी, पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांच्यासह पंजाब, कन्नड भाषेतील साहित्यिक आदींचा समावेश होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली म्हणून स्टार्ट अप इंडिया नावाने योजना आणली. स्टार्ट अप इंडिया ही योजना डीक्किची योजना असून डॉ. मिलिंद कांबळे यांनी कार्यान्वित केलेली योजना आहे, असे सांगून त्या पुढे म्हणाल्या, महापुरुषांच्या जयंतीनिमित्त एखादे टपालाचे तिकीट किंवा एखादे नाणे प्रकाशित केले जाते. परंतु, ज्याच्या डोक्यामध्ये समाजाचा विकासाचा विचार असतो, तो माणूस समाजाला विकसित करण्यासाठी योजना आणतो. देशातील सव्वा लाख बँकांमध्ये ही योजना लागू करण्यात आली.

    या बँकांमधून समाजातील युवकांना उद्योगासाठी पतपुरवठा केला तर सव्वा लाख नवीन उद्योजक तयार होतील. या पद्धतीने स्टार्ट अप इंडिया ही योजना सुरू झाली.

    वेस्टर्न इंडिया प्रेसिडेंट श्री अविनाश जगताप, कोअर कमिटी सदस्य श्री सचिन दिघोळकर यांनी, त्यांनी स्थापन केलेल्या व्यवसायाविषयी माहिती सर्व उद्योजकांना सांगितली. त्यांनी व्यवसायाच्या सुरुवातीस आलेल्या समस्यांवर कसे निराकरण केले याबद्दलही माहिती दिली.

    डिक्की नेक्स्ट जेनच्या श्रीमती मैत्रेयी कांबळे यांनी तरुण नवउद्योजकांसाठी डिक्की नेक्स्ट जन कशा पद्धतीने प्लॅटफॉर्म तयार करते याबद्दलही संपूर्ण मार्गदर्शन केले. तरुण पिढीने केलेले इनोव्हेशन तसेच प्रोजेक्ट त्या संदर्भात केंद्र सरकारकडून येणाऱ्या संधी व सवलती याबद्दलही त्यांनी पूर्ण माहिती सांगितली.

    एन.एस.आय.सीचे प्रमुख रितेश रंगारी यांनी शासनाच्या विविध योजनांचे अनुदान, सवलती या बाबींची माहिती दिली.

    कार्यक्रमाचे आयोजक तसेच सातारा जिल्ह्याचे यशस्वी उद्योजक श्री प्रसन्न भिसे यांनी सर्व नवउद्योजकांना केंद्र सरकार मार्फत मिळणाऱ्या योजना तसेच अनुदानासंदर्भात मोलाची माहिती समजावून सांगितली.

    ते सांगताना म्हणाले, एस सी कास्ट म्हणजे शेड्युल्ड कास्ट नसून स्पेशल कॅपॅबिलिटी असणारे लोक आहेत. नव उद्योजकांनी ही गोष्ट सकारात्मक रित्या घेऊन व्यवसाय सुरू करावा असे आवाहन केले.

    तसेच व्यवसाय सुरू करत असताना बँक तसेच बाजारपेठेमध्ये येणाऱ्या अडचणींवर कशा पद्धतीने मात करता येते याविषयी मोलाचे मार्गदर्शन त्यांच्याद्वारे करण्यात आले. ते पुढे सांगताना म्हणाले व्यवसाय निवडताना त्यामधील आवड तसेच त्यासंदर्भात असणारी सर्व माहिती घेऊनच व्यवसायामध्ये उतरल्यास कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच यशस्वी नियोजन दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजच्या सातारा जिल्हा कॉर्डिनेटर श्री प्रसन्न भिसे यांनी केले. यासाठी त्यांना श्री प्रशांत गवळी, श्री शुभम लादे, श्री बाळासाहेब अहिवळे, श्री संघराज अहिवळे, श्री सुमित वायदंडे यांची मोलाची साथ मिळाली.

    या कार्यक्रमाकरिता सातारा, सांगली व पुणे जिल्ह्यातील सदस्यांनी व नवउद्योजकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

No comments