अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सेवेत रुजू व्हावे आदिती तटकरे यांचे आवाहन
फलटण (ॲड. रोहित अहिवळे) - दि.३ जानेवारी २०२३ - अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आपल्या अंगणवाडीत रुजू व्हावे, कारण जवळपास ७० लाख बालकांना व गरोदर मातांना आपण अंगणवाडीच्या माध्यमातून आहार पोहोचवत असतो, सव्वा महिन्यापासून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे आंदोलन सुरू आहे, त्यांच्या आंदोलनात ज्या मागण्या आहेत, त्यातील निम्म्याहून अधिक मागण्या शासनाने पूर्ण केल्या आहेत, त्यामुळे माझी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना विनंती राहील की, आपण अंगणवाडीत लवकरात लवकर रुजू व्हावे, आपले प्रलंबित प्रश्न शासन सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले .
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमासाठी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे या नायगाव, खंडाळा येथे आल्या होत्या. त्यानंतर महाराणी सईबाई यांच्या जन्मस्थळ फलटण येथे भेट व अभिवादन कार्यक्रमासाठी फलटण येथे आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्याप्रसंगी आमदार दीपकराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. अदिती तटकरे म्हणाल्या, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या आंदोलनात ज्या मागण्या आहेत, त्यातील निम्म्याहून अधिक मागण्या शासनाने पूर्ण केलेल्या आहेत, यामध्ये १३ हजार छोट्या अंगणवाड्यांचे मूळ अंगणवाड्यात रूपांतर करण्यात आले आहे, १३ हजार मिनी अंगणवाडी सेविकांचे आता अंगणवाडी सेविका मध्ये पदोन्नती झाली आहे, तिथे आता नवीन १३ हजार मदतनीसांची पदे निर्माण होणार आहेत, त्याचबरोबर त्यांची भाऊबीज भेट, त्यांना दिल्या जाणाऱ्या सवलती, तसेच त्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते देखील सोडवण्यासाठी शासन व विभाग प्रयत्न करत आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वर्षातील ३०० दिवस बालकांना पोषक आहार द्यावा लागतो, त्यामुळे माझी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना विनंती राहील, आपण अंगणवाडीत लवकरात लवकर रुजू व्हावे, आपले जे प्रलंबित प्रश्न आहेत ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत, अनेक प्रश्न आम्ही मार्गी लावलेले आहेत, आपण बालकांना आहारापासून व सुविधांपासून लांब ठेवू नये, त्यामुळे मी विनंती करते की, आपण सेवेत रुजू व्हावे असे आवाहन ना. आदिती तटकरे यांनी केले.
पिंक रिक्षा योजना राज्यातील मोठ्या शहरांमध्ये पायलेट प्रोजेक्ट म्हणून यावर्षी सुरू करण्याचा आमचा मानस आहे व त्यानंतर संपूर्ण राज्यांमध्ये पिंक रिक्षा योजना लागू करण्यात येईल. पिंक रिक्षा योजनेत ड्रायव्हर या महिलाच असणार आहेत, त्यामुळे यामधून महिलांना रोजगार मिळेल, तसेच नोकरदार महिला व कॉलेजला जाणाऱ्या भगिनी आहेत त्यांना रात्री अपरात्री प्रवास करताना सुरक्षित वाटावे, या दृष्टीने पिंक ऑटो रिक्षा योजना लागू करण्यात येणार असल्याचे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रथम पत्नी महाराणी सईबाई यांचे स्मारक श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पुढाकाराने व शासनाच्या वतीने मंजूर झालेला आहे, राजगडाच्या पायथ्याशी त्याचे काम लवकरात लवकर सुरू होणार आहे, त्याचबरोबर महाराणी सईबाई यांच्या माहेरी फलटणच्या राजवाड्याचे देखील जतन व संवर्धन पुढील काळात शासनाकडून होणं अपेक्षित आहे व माझी खात्री आहे की, शासन सकारात्मक पावले टाकून त्याचे संवर्धन करेल.
No comments