Breaking News

जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांचे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे - डॉ.सदानंद मोरे

Jagannath aka Nana Shankarshet should be a national level memorial - Dr. Sadanand More

    फलटण (गंधवार्ता  वृत्तसेवा) दि.२७ - ‘‘जगन्नाथ शंकरशेट यांची उपेक्षा का? हा प्रश्‍न आजही उपस्थित होतो हे दुर्दैवी असून नानांचे संस्कृत भाषा, रेल्वे सुविधा, शिक्षण, समाजसुधारणा आदी क्षेत्रातील भारतीय पातळीवरचे योगदान लक्षात घेऊन केंद्र सरकार, राज्य सरकार व मुंबई विद्यापीठाच्या पुढाकारातून त्यांचे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे’’, अशी अपेक्षा राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांनी व्यक्त केली.

    फलटण (जि.सातारा) येथील युवा लेखक व चरित्र अभ्यासक अमर शेंडे लिखित महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या महाराष्ट्राचे शिल्पकार या ग्रंथमाले अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘आधुनिक मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट’ या चरित्राचे प्रकाशन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.रविंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठात संपन्न झाले. त्यावेळी अध्यक्ष स्थानावरून डॉ. सदानंद मोरे बोलत होते.  यावेळी साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकीहाळ, ना.नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेट, मुंबई विद्यापीठाचे प्र.कुलगुरु प्राचार्य डॉ.अजय भामरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

    ‘‘नाना शंकरशेट यांची ओळख ही मुंबई शहराचे शिल्पकार म्हणून आहे. लेखक अमर शेंडे यांनी लिहिलेले चरित्र म्हणजे एका परिने मुंबई शहराचा शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय इतिहास आहे. नानांच्या या चरित्रामुळे त्यांनी केलेल्या अजोड कार्याची स्फूर्ती महाराष्ट्राच्या आजच्या व भावी पिढ्यांना चैतन्यशील व प्रेरणादायी ठरेल’’, असा आशावादही डॉ.मोरे यांनी यावेळी व्यक्त केला.

    प्रा.रवींद्र कुलकर्णी म्हणाले, ‘‘नाना शंकरशेट यांनी प्रसंगी जनक्षोभ स्वीकारून सामाजिक सुधारणा, शिक्षण, उद्योग आदी क्षेत्रात बहुआयामी योगदान दिले. मुंबई विद्यापीठाने पहिल्यांदा भारतीय संस्कृती आणि परंपरेला साजेसा दीक्षान्त समारंभाचा पोशाख बदलला तेव्हा विद्वतेचे प्रतिक म्हणून नाना शंकरशेट पगडीचा स्विकार केला आणि याबदलाचे अनेकांनी स्वागत केले. मुंबई विद्यापीठाच्या जडणघडणीतील त्यांचे योगदान लक्षात घेऊन विद्यापीठातील विविध विभागामार्फत त्यांच्या योगदानावर आणि कार्यावर संशोधन करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे’’, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

    रवींद्र बेडकिहाळ यांनी, ‘‘आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आणि नाना शंकरशेठ यांनी एकत्रित केलेल्या समाजोपयोगी कार्यावर प्रकाश टाकुन, मुंबई विद्यापीठाने या दोघांच्या नावे अध्यासन सुरू करून त्यांची स्मृती जतन करावी’’, अशी अपेक्षा व्यक्त केली.

    सुरेंद्र शंकरशेट यांनी, ‘‘मुंबई विद्यापीठ, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक यांना जगन्नाथ शंकरशेट यांचे नाव द्यावे, शालेय अभ्यासक्रमात त्यांचा धडा यावा’’, अशी मागणी केली.

    चरित्र लेखक अमर शेंडे यांनी, ‘‘चरित्र निर्मितीसाठी रवींद्र बेडकिहाळ यांनी प्रोत्साहन दिले. लेखनासाठी साहित्य व संस्कृती मंडळ आणि अनेक नाना प्रेमींचे सहकार्य लाभले’’, असे सांगून ‘‘नानांचे मुंबईत यथोचित स्मारक व्हावे’’, अशी अपेक्षा व्यक्त केली.

    प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते जगन्नाथ शंकरशेठ यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन पत्रकार रोहित वाकडे यांनी केले तर आभार मुंबई विद्यापीठाचे प्र.कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमास शंकरशेट कुटुंबीय, नाना प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments