Breaking News

प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान (PM - JAN MAN) फलटण तालुक्यात प्रभावी अंमलबजावणी करणार : प्रांताधिकारी सचिन ढोले

Pradhan Mantri Janjati Adivasi Nyaya Abhiyan (PM - JAN MAN) will be effectively implemented in Phaltan taluk: Provincial Officer Sachin Dhole

    फलटण - प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान (PM - JAN MAN) अंतर्गत फलटण तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना योजनेची माहिती देवून आवश्यक कागद पत्रांची पूर्तता करुन घेण्यासाठी सबंधीत शासकीय यंत्रणांनी योग्य ती कार्यवाही तातडीने करावी अशा स्पष्ट सूचना या अभियानाचे अध्यक्ष तथा प्रांताधिकारी फलटण सचिन ढोले यांनी केल्या आहेत.

    सबंधीत शासकीय यंत्रणांना त्यांची जबाबदारी निश्चित करुन देवून योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी योग्य नियोजन करण्यासाठी प्रांताधिकारी यांचे दालनात आयोजित तालुकास्तरीय बैठकित मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी सचिन ढोले बोलत होते. यावेळी तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, अभियान सचिव तथा नोडल अधिकारी व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

    तालुक्यातील पात्र कुटुंबांना या योजनेसाठी लागणारी कागद पत्रे उदा.आधारकार्ड, जॉबकार्ड, शिधा पत्रिका, बँक खाते, जातीचे दाखले, किसान क्रेडिट कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड वगैरे कागद पत्रांबाबत सबंधीत खात्याचे विभाग प्रमुखामार्फत आवश्यक कार्यवाही तात्काळ करुन सदर योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेबाबत स्पष्ट सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सर्व शासकीय यंत्रणांना यावेळी दिल्या आहेत.

    प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान (PM - JAN MAN) अंतर्गत पात्र लाभार्थी कुटुंबांना घरकुलांसाठी लागणारी जागा, पिण्याचे पाणी, दिवाबत्तीची सोय, रस्ते आणि अन्य आवश्यक नागरी सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. घरकुलासाठी २ लाख ३९ हजार रुपये, एसबीएम कडून शौचालयासाठी १२ हजार रुपये, रोजगार हमी योजनेकडून २७ हजार रुपये असे अनुदान मिळणार असल्याचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी निदर्शनास आणून देत योजनेत सहभागी होऊन लाभघेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे या बाबत माहिती दिली.

    पंचायत समिती फलटण मार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार खामगाव, ता. फलटण येथे कातकरी समाजातील सुमारे ३० पात्र कुटुंबे असल्याचे दिसून आले असून त्यांच्याकडे आवश्यक कागद पत्रे नसल्याचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी निदर्शनास आणून देत त्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र साखरवाडी शाखेने सर्व पात्र कुटुंबांची बँक खाती उघडून घेण्याची कार्यवाही सुरु केल्याचे सांगितले.

    आधार कार्ड साठी पोस्ट ऑफिस मार्फत सदर गावात खास कॅम्प लावून व्यवस्था करावी, महसूल खात्यांतर्गत पुरवठा विभागाने संबंधीत कुटुंबाकडून आवश्यक कागद पत्र, फोटो, माहिती घेऊन ज्यांच्याकडे शिधापत्रिका नसतील त्यांना त्या तातडीने उपलब्ध करुन द्याव्यात, जातीचे दाखले त्यांच्या मूळ गावातून मिळणार असल्याने त्याबाबत माहिती घेऊन योग्य कार्यवाही करावी, खामगावात असलेल्या शासकीय जमिनीची कागद पत्र तातडीने तपासून सदर जमीन या योजनेसाठी देता येईल का आणि ती पुरेशी आहे काय याबाबत अहवाल तातडीने तयार करुन सादर करावा, म्हणजे त्याबाबत जिल्हाधिकारी यांचे संमतीने योग्य कार्यवाही करण्याचे संकेत प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी बैठकीत दिले.

    खामगाव व्यतिरिक्त अन्य गावात पात्र लाभार्थी कुटुंबे असतील तर त्यांचा शोध घेण्याचे आवाहन करताना त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर योजनेची माहिती देण्याच्या सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केल्या आहेत.

No comments