साखरवाडी येथे नवविवाहितेची आत्महत्या ; पती व सासूच्या विरोधात गुन्हा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - नवविवाहितेचा मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी साखरवाडी येथील पती व सासूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पती व सासू यांना अटक करण्यात आली आहे.
सुशील रामचंद्र घोलप वय ३२ व कल्पना रामचंद्र घोलप वय ६० दोन्ही राहणार साखरवाडी ता. फलटण अशी संशयित आरोपींची नवे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, मयत वृषाली व सुशील घोलप यांचा ३१ जानेवारी २०२३ रोजी विवाह झाला होता व त्यानंतर ते साखरवाडी या ठिकाणी राहत होते. मार्च २०२३ ते दिनांक २६/१२/२०२३ रोजीच्या दरम्यान मौजे साखरवाडी ता. फलटण गावचे हद्दीत जावई सुशील रामचंद्र घोलप व सासू कल्पना रामचंद्र घोलप रा. साखरवाडी ता. फलटण हे मुलगी वृषाली हीस घरातील काम व्यवस्थित येत नाही, स्वयंपाक करता येत नाही, सकाळी लवकर उठत जा तसेच घर खर्चासाठी माहेरून पैसे घेऊन ये असा सतत मानसिक त्रास देत होते. त्यामुळे सततच्या त्रासाला कंटाळून मुलगी वृषाली सुशील घोलप वय २८ वर्षे हिने तिच्या राहत्या घरी दिनांक ३०/१२/२०२३ रोजी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली असल्याची फिर्याद मयत नवविवाहितेच्या आईने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक हुलगे हे करीत आहेत.
No comments