फलटण आरटीओ कार्यालयास मंजुरी ; पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले - खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२२ - खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व्हावे यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रव्यवहार करून व पाठपुरावा करून मागणी केली होती. त्याप्रमाणे आज राज्य शासनाचे अंतिम मंजुरीचे पत्र सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयास प्राप्त झाले आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खासदार झाल्यापासून या तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे काम सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज फलटण येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू होत आहे. फलटणला सत्र न्यायालय सुरू झाले. आता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू होत आहे व लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयाची शाखा सुरू होणार आहे.
फलटण तालुक्याचा सुपुत्र खासदार झाल्यानंतर अनेक वर्ष रखडलेले काही मूलभूत प्रश्न मार्गी लागून, या तालुक्यामध्ये विकासाची गंगा सुरू झाली. रोज नवीन नवीन विकास कामे मंजूर होत आहेत याचा फायदा फलटण तालुक्यातील जनतेला नक्कीच होणार आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामुळे फलटण तालुक्यातील जनतेचे सातारला जाण्याचे हेलपाटे वाचणार आहेत व वेळ व पैश्याची बचत होणार आहे. या मंजुरी मध्ये लवकरच शासनाने काही मुद्द्याबाबत माहिती प्रांत कार्यालय फलटण यांना मागवली आहे. ती सुद्धा लवकरच तयार होऊन येत्या काही दिवसात फलटणला हे कार्यालय सुरू होईल असा विश्वास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.
No comments