लग्न करण्यासाठी मामे बहिणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाऊ - बहिणीच्या विरोधात गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ - २ वर्षांपासून मामे बहिणीस माझ्याशी लग्न कर अशी मागणी करत, तिचे फोटो एडिट करून, तिला बदनाम करण्याची धमकी दिल्यामुळे पीडित मुलीने आत्महत्या केल्याप्रकरणी संशयित भाऊ - बहिणीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यातील संशयित आरोपी श्रीधर खराडे यास अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मयत मुलगी व संशयित आरोपी श्रीधर उर्फ बाळा कल्याण खराडे रा.ताथवडा ता.फलटण व योगिता अमोल शिंदे रा.कोपर्डे हे मामे बहीण भाऊ आहेत. मयत मुलगी हिचा भाऊ शुभम अर्जुन शिंदे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मागील २ वर्षापासून ते दि.१०/२/२०२४ रोजी पर्यंत वेळोवेळी श्रीधर उर्फ बाळा कल्याण खराडे याने, माझ्याशी लग्न कर असे म्हणून तसेच योगिता अमोल शिंदे रा.कोपर्डे ता.खंडाळा जि.सातारा हिने तिचा भाऊ श्रीधर याचे सोबत लग्न करणेसाठी फोटो एडिट करून, लोकांमधे बदनामी करण्याची धमकी देऊन बहिणीला मानसिक त्रास दिला, म्हणून तिने दि. १५/२/२०२४ रोजी मौजे शिंदेवस्ती निंबळक येथे आत्महत्या करून जीवन संपवले असल्याची फिर्याद दिली आहे. या अनुषंगाने श्रीधर खराडे व योगिता शिंदे यांच्या विरोधात विनयभंग व आत्महत्या करण्यास प्रवृत्ती केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रानगट हे करीत आहेत.
No comments