Breaking News

खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळाला ; वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ करण्याचा निर्णय ; श्रीमंत रामराजे यांच्या प्रयत्नांना यश - आ. दीपक चव्हाण

Farmers got justice; Decision to convert Class 2 lands to Class 1

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ फेब्रुवारी - खंडकरी शेतकरी यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून या निर्णयामुळे वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये  तबदिल करता येणार आहेत. या निर्णयामुळे अनेक खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच या प्रश्नासाठी गेली अनेक वर्ष ज्यांनी प्रयत्न केले ते विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे मनापासून अभिनंदन करत असल्याची भावना फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र शेत जमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम १९६१ (सुधारणा) अधिनियम २०२३ अन्वये कलम २८-१ अअ मध्ये भोगवटादार वर्ग-२ असणाऱ्या जमिनी भोगवटादार वर्ग-१ या सत्ताप्रकाराने देण्यासाठी आवश्यक त्या अधिनियमात स्वतंत्ररित्या सुधारणा करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने परिपत्रक जारी केले आहे या पार्श्वभूमीवर फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण बोलत होते.

पुढे बोलताना आ. दीपक चव्हाण म्हणाले, आम्ही सातत्याने या प्रश्नाविषयी आवाज उठवला, अनेक अधिवेशनामध्ये याबाबत लक्षवेधी, प्रश्न उपस्थित केले.  त्यानंतर या प्रश्नाला न्याय मिळाला. मागील अधिवेशनाला प्रश्न उपस्थित केल्यानंतर संबंधित मंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिले आणि त्यानंतरच्या काळामध्ये वर्ग दोन च्या जमिनी वर्ग एक करण्याचा कायदा करण्यात आला आणि आज प्रत्यक्षात त्या कायद्याचे परिपत्रक शासन निर्णय जाहीर करण्यात आले. यामुळे निश्चितपणे जो खंडकरी शेतकरी आहे त्याला फार मोठा दिलासा मिळणार आहे, ज्या जमिनी खंडाने देताना वर्ग एकच्या होत्या, त्या जमिनी पुन्हा वर्ग १ करताना, त्या शेतकऱ्याला कुठलंही अधिमूल्य भरावे लागणार नाही, परंतु ज्या जमिनी खंडाने देताना वर्ग २ च्या होत्या, त्या जमिनीला सरकारी नियमाप्रमाणे अधिमुल्य भरून, त्याही जमिनी वर्ग एकच्या करता येणार आहेत. त्यामुळे निश्चितपणे या निर्णयामुळे फार मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळाला आहे. 

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे त्याकाळी महसूल मंत्री असताना त्यांच्या नावे समिती स्थापन करण्यात आली होती, त्या समितीने अनेक शिफारशी शेती महामंडळाच्या संबंधित केल्या होत्या, त्यापैकी ही एक शिफारस होती, ती शिफारस आज मंजूर झाली, त्यामुळे श्रीमंत रामराजे यांचेही या कामी फार मोठे योगदान असल्याचे फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार दीपक राव चव्हाण यांनी स्पष्ट केले.

No comments