पुढच्या पिढीला वाचवायचे असेल तर संजीवराजे यांच्या शिवाय पर्याय नाही - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ - खासदारांचे निम्म्याहून अधिक कार्यकर्ते आपल्याकडे येण्याचे मनस्थितीत आहेत, ही आजची परिस्थिती आहे. ते स्वप्नात आहेत, मोदींच्या नावावर ३० ते ४० टक्के मते घेऊन चुकून खासदार झालेले आहेत. मी त्यांना मागेच चॅलेंज दिले होते की दोघेही अपक्ष उभे राहू आणि कोण निवडून येते ते बघू, त्यांना मोदींच्या शिवाय पर्याय नाही, मोदींच्या नावावर मते मिळवतात असे सांगतानाच सोशल मीडियावर कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात कमेंट केली तरी देखील त्यांना धमकीचे फोन येतात, कार्यकर्त्यांना धमकावले जात आहे, परंतु आता कार्यकर्त्यांनी कोणालाही भिऊ नये, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, आपल्याला पुढच्या पिढीला वाचवायचे असेल तर संजीवराजे यांच्या शिवाय पर्याय नाही. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत संजीवराजे यांना लोकसभेवर पाठवायचे आहे. महायुतीच्या माध्यमातून संजीवराजे यांना तिकीट मिळवण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणारच आहे आणि संजीवराजेंना तिकीट मिळालेच नाही तर त्यांनाही मिळू देणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले केले.
आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अनंत मंगल कार्यालय, कोळकी, फलटण येथे आज कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमंत रामराजे बोलत होते. यावेळी आ. दिपकराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सुरेंद्र गुदगे, मनोजतात्या पोळ, बाळासाहेब सोळस्कर, रमेश धायगुडे, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, डी. के पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
श्रीमंत रामराजे म्हणाले की, आजचा कार्यकर्ता मेळावा हा आपण गेली पाच वर्षे सहन करत असलेल्या या सहनशक्तीचा अंत करण्यासाठी घेतला आहे, परत पुढची पाच वर्षे हा खासदार नको हे ठरवण्यासाठीच हा मेळावा आयोजित केला असून, माझ्यासह कार्यकर्त्यांना मनमोकळेपणे बोलता यावे, अडचण होऊ नये म्हणून आजच्या मेळाव्याच्या बॅनरवर नेते मंडळींचा समावेश करण्यात आला नाही, मात्र मीडियावर याची चुकीची व वेगळी चर्चा झाली असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
मी जलसंपदा मंत्री होतो, त्यावेळी जलसंपदा खात्याला पुरेसा निधी द्यायला हवा होता, परंतु जलसंपदा खात्याला तसा निधी दिला गेला नाही, जर पंधरा-वीस टक्के निधी या खात्याला दिला असता तर मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रावर दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण झाली नसती, त्यावेळी कर्नाटक आंध्रप्रदेशने लवादाप्रमाणे पाण्याचे वाटप करून घेतलं होतं, कृष्णा महामंडळ स्थापन झाल्यानंतर माझ्या डोक्यात हे पक्क गणित बसलं होतं की, आपल्याला ३१ मे २००० पूर्वी धरणं सुरू करायची व शक्य झालं तर त्या धरणात पाणी साठवन सुरू करायची आणि फक्त धोम बलकवडी धरणच नव्हे तर सातारा जिल्ह्यातील तारळी,उरमोडी, बलकवडी, निरादेवघर, गुंजवणी तसेच पुणे व कोल्हापूर मधील काही धरणे या सर्व धरणासाठी त्यावेळी प्रयत्न केले नसते तर आज ही धरणे अस्तित्वात आली नसती असे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
कृष्ण खोऱ्याला निधी मिळत नव्हता त्यावेळी आम्ही कर्जरोख्यातून निधी उभा केला, कर्जरोख्यातून १७०० कोटी रुपये उभे केले आणि त्यावेळेस या धरणांच्या प्रशासकीय मान्यता घेण्यात आली टेंडर काढण्यात आली, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी या दुर्गम भागात पायी घरोघरी फिरलो आहे, त्यावेळी अभयसिंहराजे, विक्रमसिंह पाटणकर व आनंतराव थिटे यांची देखील भरपूर मदत झाली आहे मात्र हे सर्व खासदारांना माहित नाही त्यांना फक्त आत्ता धरणांना मिळालेल्या वाढीव मान्यता व भूमिपूजन माहित आहेत असा टोला श्रीमंत रामराजे यांनी लगावला.
जिल्ह्यातील पाणी अडवून बरेचश्या प्रकल्पाचा पाया मी घातलेला आहे धोम बलकवडी आणि नीरा देवघर चे पाणी मीच आणले असून खासदार म्हणून यांनी काहीच काम केलेले नाही. आम्ही आमदार म्हणून केलेल्या कामांवर हे दोघे नागोबा आयत्या पिठावर रेगोट्या ओढण्याचे काम करत आहे. खासदार झाल्यापासून काय काम केले, आमदार करतात ती कामे करून त्याचे श्रेय घेत आहेत, हा त्यांनी रेल्वे आणली हे मान्य करू, मात्र तुमची रेल्वे रिकामी फिरते त्याला आम्ही काय करायचे असा मिश्किल सवाल श्रीमंत रामराजे यांनी केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फलटण येथे झालेल्या सभेत फडणवीस माझ्याकडे आल्यामुळे खासदार म्हणाले की आम्ही कडू गोळी गिळली आहे, पण तुमचे तोंडच कडवट आहे तुमच्या जिभेतून चांगले काहीच आलेले मी बघितलेच नाही अशी टीकाही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली.
कृष्णा खोऱ्याची स्थापना ही वास्तविक श्रीमंत रामराजे यांच्यामुळेच झालेली आहे. श्रीमंत रामराजे यांच्यामुळेच धोम - बलकवडी प्रकल्प पूर्णत्वास गेले आहे असे मत यावेळी श्रीमंत संजीवराजे यांनी व्यक्त केले.
अहंकारी माणसे माण आणि फलटण तालुक्यात आली आहेत त्यांचा बीमोड करा, त्यांचा अहंकार मोडण्याची संधी लोकसभा निवडणुकीत आली आहे. संजीवराजे यांनी म्यानातून तलवार बाहेर काढली आहे आता गुलाल घेऊनच ती म्यान करा, माघार घेऊ नका असे आवाहन सुरेंद्र गुदगे यांनी केले.
यावेळी आमदार दीपक चव्हाण, बाळासाहेब सोळसकर तसेच विविध गावच्या कार्यकर्त्यांची भाषणे झाली.
No comments