भारतीय तत्त्वज्ञान ही वैभवशाली संस्कृती तिचे संवर्धन झाले पाहिजे ; मराठी साहित्य संमेलनात डॉ. नवनाथ रासकर यांनी अध्यक्षीय भाषणात मांडले विचार
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलताना प्रा. डॉ. नवनाथ रासकर |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.७ - अंमळनेर येथे २ ते ४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान झालेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ४ फेब्रुवारी २०२४ रोजी 'भारतीय तत्त्वज्ञान एक वैभवशाली संस्कृती' या विषयावर दुपारी झालेल्या सत्रामध्ये कविवर्य ना. धो. महानोर सभा मंडपात अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. नवनाथ रासकर, मुधोजी महाविद्यालय फलटण हे उपस्थित होते. यावेळी डॉ. राधिका पाठक अंमळनेर यांनी 'भक्ती मार्गाचा विकास आणि आदर्श जीवन 'तर डॉ. बाजीराव पाटील धुळे यांनी 'संत परंपरा व विश्वबंधुत्व ' या विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी केली.
या परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. नवनाथ रासकर यांनी भारतीय तत्त्वज्ञान ही एक वैभवशाली संस्कृती आहे, हिचे संवर्धन झाले पाहिजे अशी मांडणी करताना, तत्वज्ञान म्हणजे काय ते सांगून, समीक्षा हे तत्त्वज्ञानाचे कार्य आहे, ते ज्याप्रमाणे ईश्वर - आत्मा - मोक्ष या अध्यात्मिक धार्मिक गोष्टींची चिकित्सा करते, त्याप्रमाणेच ते विज्ञानाचीही चिकित्सा करते, म्हणजे चिकित्सा हे तत्त्वज्ञानाचे एक महत्त्वाचे कार्य आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे भारतीय भूमीत उदयाला आलेले वेगवेगळे विचार प्रवाह म्हणजे भारतीय तत्त्वज्ञान होय अशी भूमिका मांडली. भारतीय तत्त्वज्ञानाचा इतिहास खूप प्राचीन आहे असे सांगून भारतीय तत्त्वज्ञान वेदपूर्व मुनी परंपरा, वैदिक ऋषी परंपरा आणि या दोन्ही परंपरांच्या आंतरक्रियातून तयार झालेली तिसरी परंपरा या तिन्हींच्या पार्श्वभूमीतून भारतीय तत्त्वज्ञानाकडे पाहिले पाहिजे. असे सांगून त्यांनी चार्वाक, जैन, बौद्ध ,वैशेषिक, न्याय, सांख्य, योग, पूर्वनिमांसा आणि वेदांत या प्रमुख नऊ दर्शनांचा आढावा त्यांनी याप्रसंगी घेतला. ही दर्शने जरी परस्पर विरोधी वाटत असली तरी त्यांच्या मांडणीतून विसंवादाचे सूर निघाले नाहीत. पूर्वपक्ष- उत्तरपक्ष या विचार पद्धतीच्या माध्यमातून ही दर्शने घडली असल्याने यांच्या मांडणीतून वैचारिक प्रगल्भताच प्रकट झालेली आहे असे सांगितले.
डॉ.रासकर यांनी यावेळी चार्वाकांची जडवादी भूमिका, स्व-स्वतःच्या इंद्रियांना जिंकण्यातून महाविरत्व येते ही जैन आणि स्व जाणिवेतून बुद्धत्व येते ही बौद्ध दर्शनाची भूमिका स्पष्ट केली, वैशेषिकांचा विज्ञानाला जवळचा परमाणुवाद सांगून, न्याय दर्शनातील प्रमाणांची चर्चा, सांख्य दर्शनातील पुरुष प्रकृती विचार आणि योगदर्शनातून सबंध भारतीय तत्त्वज्ञानाचे उपयोजन कसे केले जाते हे सांगून, पूर्वनिमांसकांनी धार्मिक विधींना दिलेले महत्त्व आणि वेदांतातील प्रगल्भ आत्मविचार या अनुषंगाने डॉ. रासकर यांनी प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला तत्त्वज्ञान विषयाच्या अनुषंगाने इथून पुढे कायमस्वरूपी एखादे सत्र ठेवावे असे आवाहन केले आहे. यापूर्वीच्या कोणत्याही संमेलनामध्ये तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने परिसंवाद झाला नव्हता पण अंमळनेर येथे प्रताप तत्त्वज्ञान केंद्र हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तत्त्वज्ञान केंद्र असल्याने, ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन आयोजकांनी या विषयावर परिसंवाद ठेवला. पण खरोखर साहित्याचा दर्जा उंचावण्यासाठी मग ते काव्य असेल कादंबरी असेल वैचारिक साहित्य असेल त्यासाठी तत्त्वज्ञानाची पार्श्वभूमी महत्वाची ठरते. भारतीय तत्त्वज्ञान हे माणूस घडवणारे तत्त्वज्ञान आहे, एवढेच नव्हे तर मानवी जीवनाला अर्थवता बहाल करणारे आहे. हे लक्षात घेऊन तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने एक सत्र ठेवण्याविषयी डॉ.रासकर यांनी साहित्य परिषदेला आवाहन केले आहे.
या सत्राचे सूत्रसंचालन सौ. वसुंधरा लांडगे अंमळनेर यांनी केले.
No comments