वकील आणि न्यायालयाने सहकार्य व सांगड ठेवावी - उच्च न्यायालय न्या. प्रकाश नाईक
फित कापून फलटण अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय उद्घाटन करताना मुबई उच्च न्यायालयातील न्या. प्रकाश नाईक, शेजारी जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. विनायक जोशी व मान्यवर (छाया - अमित फोटो) |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.४ फेब्रुवारी - वकील आणि न्यायालय यांच्यामध्ये एक प्रकारची सांगड असल्याशिवाय ज्यूडिसिरी मध्ये कामकाज करणे शक्य होत नाही. गरज नसताना तारखा घेतल्या तर न्यायालयाचे काम वाढते, अंडरट्रायल, पेंडिंग केसेस जर लवकर संपवायच्या असतील तर वकील आणि न्यायालयाने सहकार्य व सांगड ठेवणे गरजेचे आहे. असे सांगतानाच अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या माध्यमातून या भागातील लोकांना वेळ व पैशाची बचत करुन, प्रवास टाळून येथे घराजवळ न्याय मिळण्याची संधी प्राप्त झाली आहे, त्याचा लाभ लोकांना मिळवून देण्यासाठी वकिलांनी आपल्या पक्षकाराची बाजू अभ्यासपूर्वक मांडून काम करण्याचे आवाहन मुंबई उच्च न्यायालयातील न्या. प्रकाश नाईक यांनी केले.
फलटण अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय येथे न्या. चतुर यांना खुर्चीवर बसविल्यानंतर सोबत न्या. नाईक, न्या. जोशी व अन्य मान्यवर (छाया - अमित फोटो) |
फलटण येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय उद्घाटन न्या. प्रकाश नाईक यांच्या हस्ते समारंभपूर्वक झाले, त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना न्या. नाईक बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. विनायक रा. जोशी होते. यावेळी फलटणचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. प्रविण विमलनाथ चतुर, महाराष्ट्र गोवा वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. वसंतराव भोसले, श्री. कोंडे देशमुख हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमास उपस्थित विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, प्रल्हादराव साळुंखे पाटील व इतर मान्यवर |
विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, प्रल्हादराव साळुंखे पाटील, जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय न्यायायातील न्यायाधीश, तेथील वकील संघांचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य, महसूल व पोलिस अधिकारी, पक्षकार उपस्थित होते.
कार्यक्रमास उपस्थित खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व इतर मान्यवर (छाया - अमित फोटो) |
गेली तीस वर्ष फलटणच्या वकीलवर्गाने केलेल्या सतत प्रयत्नांना यश आले आहे. फलटणच्या पक्षकारांना न्याय मिळवून देण्यासाठी हे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू करण्यात आले आहे. न्याय मिळवून घेण्यासाठी लोकांना, जे अथक प्रयत्न करावे लागतात, त्यामध्ये न्यायालय जवळ असणे हे एक अति महत्त्वाची गोष्ट आहे. आणि वकील वर्गाच्या अथक प्रयत्नामुळे हे यश आपल्याला मिळाले आहे. आता फलटणच्या पक्षकारांना लांब जावे लागणार नसल्याचे न्या. प्रकाश नाईक यांनी स्पष्ट केले.
न्याय हा घटनात्मक अधिकार असून तो सर्वांना मिळालाच पाहिजे, तो या न्यायालयात नक्की मिळेल याची ग्वाही देत, वकील व न्यायालय यांची सांगड असल्याशिवाय न्यायालयाचे कामकाज सुरळीत चालणार नाही, गरज नसेल त्यावेळी तारखा न घेता प्रत्यक्ष कामकाज चालवून लवकर न्याय प्रक्रिया गतिमान करा, लोकांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास ढळू देवू नका असे आवाहन न्या. प्रकाश नाईक यांनी केले.
कोणत्याही खटल्यामध्ये दोन बाजू असतात, न्याय एकालाच मिळतो, मात्र वकिलांनी आपल्या पक्षकाराची बाजू अभ्यासपूर्वक मांडून त्यांचा विश्वास जपला पाहिजे, कोर्टाशी भांडून नव्हे आपली बाजू कायदेशीर दृष्ट्या भक्कमपणे मांडून पक्षकाराचा विश्वास सांभाळा असे आवाहन न्या. नाईक यांनी वकिलांना केले.
स्वातंत्र्य संग्रामात वकिलांचा सक्रिय सहभाग होता, लोकांना कायदेशीर मार्गदर्शन करण्यात वकील कार्यरत असतात, सामाजिक क्षेत्रातही वकिलांचा मोठा सहभाग असल्याचे न्या. नाईक यांनी आवर्जुन सांगितले.
पक्षकाराची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी वकिलांनी, लॉ ऑफ जुरीस्प्रुडन्स, प्रोसिजरल लॉ, इव्हीडन्स ॲक्ट, इंडीयन पिनल कोड वगैरे कायद्याचा अभ्यास तर केलाच पाहिजे त्याशिवाय विविध निकाल आणि अवांतर वाचन केले पाहिजे, त्याशिवाय भाषेवर प्रभुत्व असले पाहिजे कोर्टासमोर बाजू मांडताना सहजपणे मात्र अभ्यासपूर्ण बाजू मांडल्याने न्यायालय आपली बाजू एकण्यास अधिक वेळ देते आणि आपली बाजू समजावून घेतल्याने न्यायासाठी त्याचा निश्चित उपयोग होत असल्याचे न्या. नाईक यांनी निदर्शनास आणून दिले.
फलटण वकील संघाच्या सदस्यांना या न्यायालयाच्या माध्यमातून आपली वकिली अधिक चांगल्या प्रकारे वृध्दींगत करण्याची संधी उपलब्ध झाली आहे, आपली बाजू प्रभावीपणे कशी मांडावी, उलट तपासणी कशी घ्यावी हे आत्मसात करा त्यासाठी संविधानाचा अभ्यास करा, निकाल पत्रांचा अभ्यास करा, वक्तृत्व कला विकसित करा असे आवाहन यावेळी न्या. नाईक यांनी केले.
सहज, सुलभ, कमी खर्चात न्याय मिळावा यासाठी न्याय यंत्रणा कार्यरत आहे, फलटण जिल्हा न्यायालयात १२०० खटले वर्ग झाले असून सकारात्मक भूमिका घेऊन न्याय प्रक्रिया राबवावी, जुनी प्रकरणे खूप आहेत ती प्राधान्याने निकाली काढावीत असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. विनायक जोशी यांनी अध्यक्षीय भाषणात केले.
यावेळी महाराष्ट्र गोवा वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. वसंतराव भोसले, फलटणचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. प्रविण विमलनाथ चतुर यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस फलटण वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अजित पठाण यांनी प्रास्ताविक भाषण केले तर वकील संघाचे सचिव ॲड. अमोल सस्ते यांनी आभार मानले.
No comments