फलटण - बारामती रेल्वे २०२६ मध्ये सुरू होणार ; सेंट्रल रेल्वे जीएम राम करण यादव व खा. रणजितसिंह यांनी केले इन्स्पेक्शन
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर समवेत सेंट्रल रेल्वेचे जनरल मॅनेजर राम करण यादव, डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर पुणे विभाग श्रीमती इंदू दुबे |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० - फलटण - बारामती रेल्वे मार्गाचे काम मोठ्या थाटात सुरू होणार असून, फलटणकरांचे दिल्लीला जाण्याचे स्वप्न २०२६ मध्ये पूर्ण होईल. या रेल्वे मार्गाचे काम २०२६ च्या जून पर्यंत होईल व डिसेंबर २०२६ ला आपण निश्चितपणे दक्षिणेकडून येणाऱ्या रेल्वेमध्ये फलटण ते दिल्ली प्रवास करू शकणार असल्याचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
सेंट्रल रेल्वेचे जनरल मॅनेजर यांच्या समवेत खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी पाहणी दौरा केल्यानंतर, फलटण रेल्वे स्टेशनवर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. याप्रसंगी सेंट्रल रेल्वेचे जनरल मॅनेजर राम करण यादव, चीफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर अविनाश कुमार पांडे, डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर पुणे विभाग श्रीमती इंदू दुबे, चीफ प्रोजेक्ट मॅनेजर राजेश उपाध्याय, चीफ पब्लिसिटी ऑफिसर स्वप्निल नीला, चीफ इंजिनियर सुरेश पाखरे, डेप्युटी चीफ इंजिनियर सागर चौधरी व मोहित सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
फलटण - पंढरपूर रेल्वे मार्गावर लावण्यात आलेले बोर्ड |
पुढे बोलताना खासदार रणजितसिंह म्हणाले की, फलटण - पंढरपूर रेल्वे मार्गाचे काम देखील लवकरच सुरू होईल, याचा सर्वे पूर्ण झालेला आहे. रेल्वेने संपादन केलेल्या जमिनीवर बोर्ड लावण्यात आलेले आहेत. रेल्वेच्या डीपीआर आणि राज्य शासन यांची अंतिम मंजुरी याच वर्षात झालेली आहे. देशाच्या बजेटमध्ये या प्रकल्पाला वीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, बजेटच्या प्रोव्हिजन नंतर स्क्रीनिंग कमिटीची फायनल मिटिंग येणाऱ्या आठवड्यामध्ये होईल. त्यानंतर नीती आयोग व नंतर कॅबिनेट मंजुरीसाठी जाईल व त्यानंतर फलटण - पंढरपूर रेल्वेचे देखील काम सुरू होईल असे खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले
फलटण ते पुणे जाणार्या रेल्वे गाडीस वेळ लागतो, तर तो वेळ कमी करण्यासाठी, ठिकठिकाणी ऑटोमॅटिक गेट आणि आणि भुयारी मार्ग करण्याची टेंडर निघालेली आहेत, बऱ्याच ठिकाणची कामे सुरू आहे, त्यामुळे आता फलटण - पुणे गाडीचा वेग वाढवून, आपण पुण्यामध्ये दोन तासात पोहोचू शकणार आहे, त्याचबरोबर पालखी महामार्ग रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळून गेला असल्यामुळे आपल्याला रेल्वे स्टेशनला येण्या जाण्यासाठी सुलभ होणार असल्याचे खा. रणजीतसिंह यांनी सांगितले.
फलटण बारामती रेल्वे मार्गाचे इन्स्पेक्शन आज आम्ही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समवेत केले आहे. फलटण बारामती प्रोजेक्ट फायनल झाला असून, त्याची ड्रॉईंग व लँड एक्वीजीशन प्रोसेस झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी या रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्यात येईल. फलटण - बारामती रेल्वे मार्ग २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येईल असे सेंट्रल रेल्वेचे जनरल मॅनेजर राम करण यादव यांनी सांगितले.
फलटण पंढरपूर रेल्वे मार्गाचा प्रोजेक्ट रेल्वे बोर्डकडे पाठवून दिलेला आहे. २ हजार करोडच्या वर याची कॉस्ट आहे आणि तो निती आयोगामार्फत मंजूर होईल, याच्या दोन-तीन मीटिंग झालेल्या आहेत, हा प्रोजेक्ट देखील लवकरात लवकर मंजूर करण्यात येईल. या प्रोजेक्टमध्ये जमीन संपादनाचे काम पूर्वीच झालेले आहे. नीती आयोगाकडून मंजुरी आली की लगेच याच्या कामकाजास सुरुवात होईल असे सेंट्रल रेल्वेचे जनरल मॅनेजर राम करण यादव यांनी सांगितले.
No comments