फलटण येथे आज कुस्त्यांचे जंगी मैदान व नागरी सत्कार ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.११ - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण येथे आज सोमवार दि.१२ फेब्रुवारी २०२४ रोजी सांयकाळी ५ वाजता, यशवंतराव चव्हाण हायस्कुल, फलटण येथे भव्य कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून यावेळी ना. आ. महेश शिंदे व ना.राजेश क्षीरसागर यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे तालुका प्रमुख नानासो इवरे यांनी दिली आहे.
विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत इवरे बोलत होते. यावेळी महिला आघाडीच्या तालुका प्रमुख नंदिनी गायकवाड, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पवार, शहर प्रमुख निलेश तेलखडे यांची उपस्थिती होती.
सोमवार दि. १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता फलटण शहरातील यशवंतराव चव्हाण हायस्कुल येथे कृष्णा खोऱ्याच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आ. महेश शिंदे व राज्य नियोजन महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजेश क्षिरसागर यांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे, सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ.सचिन सूर्यवंशी-बेडके, सातारा जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, सोलापूर जिल्हाप्रमुख संजय कोकाटे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख रणजीतसिंह भोसले, जिल्हा संघटिका शारदाताई जाधव, उपजिल्हाप्रमुख अविनाश फडतरे आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी सदर कार्यक्रमास फलटण शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन फलटण तालुका शिवसेना, युवासेना व महिला आघाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments