Breaking News

ताथवडे येथे जुगार अड्ड्यावर छापा ; ४ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

raid on gambling den at Tathwade; 4 lakh 81 thousand rupees seized

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ - फलटण पुसेगाव रस्त्यावरील ताथवडे ता. फलटण गावच्या हद्दीत उघड्या माळावर झाडाखाली सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर फलटण ग्रामीण पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ४ लाख ८१ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याठिकाणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली तर दोघेजण पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत.

    तन्वीर अस्लम पटवेकर वय २४, प्रकाश भानुदास गार्डी वय ३०, शेखर तुकाराम थोरात, नाना मसुगडे सर्वजण रा. ढवळ ता. फलटण, दीपक बापू जाधव वय ४१, रा. वाघोशी, ता. फलटण, पोपट संपत तरटे वय ३९ रा. माळवाडी, ता. फलटण, मल्हारी नामदेव जाधव वय २६, रा. फलटण अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. यातील शेखर तुकाराम थोरात व नाना मसुगडे दोघेही रा. ढवळ, ता. फलटण हे घटनास्थळातून पळून गेले असून उर्वरित संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. 

    या बाबत ग्रामीण पोलिस ठाण्याकडून समजलेली माहिती अशी, बुधवार दि. २१ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास पोलिसांनी ताथवडा ता. फलटण गावच्या हद्दीतील एका उघड्या माळावरील जुगाराचा अड्डा चालू असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार त्यांनी तेथे धाड टाकली असता सदर संशयित आरोपी तीन पाणी पत्त्यावर जुगार खेळताना मिळून आले. घटनास्थळाहून पोलिसांनी साडे नऊशे रुपये रोख व पाच मोटारसायकली असा एकूण चार लाख ८१ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संबंधितांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत खरात यांनी दिली असून तपास पोलिस नाईक पवार करीत आहेत.

    दरम्यान फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात जर कुठेही अवैध धंदे सुरू असतील तर त्याची माहीत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.

No comments