सातारा जिल्हा पत्रकार भवनाच्या उद्घाटनाचा १४ रोजी स्वप्नपूर्ती सोहळा
सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२ - सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी गेली अनेक वर्षे पाहिलेल्या हृदयस्पर्शी अशा एका स्वप्नाची पूर्तता झाली असून या स्वप्नपूर्तीचा दिमाखदार सोहळा बुधवार दि. 14 फेबु्रवारी 2024 रोजी सातार्यात गोडोली येथील साईबाबा मंदिराजवळ व हॉटेल लेक व्ह्यूच्या संस्कृती लॉनवर होत आहे. सातारा जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार भवन समितीने साकारलेल्या ‘सातारा जिल्हा पत्रकार भवनाचे’ उद्घाटन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या हस्ते होत असल्याची माहिती पुणे विभागीय अधीस्वीकृती समितीचे अध्यक्ष, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे व सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली.
100 वर्षांहून अधिक दिमाखदार पत्रकारितेची परंपरा असलेल्या सातारा जिल्ह्यात पत्रकारांचे हक्काचे सातारा जिल्हा पत्रकार भवन नव्हते. सातार्यात जिल्हा पत्रकार भवन व्हावे, अशी मनोमन इच्छा सातारा जिल्ह्यातील प्रत्येक पत्रकाराच्या मनात गेल्या कित्येक वर्षांपासून घर करुन होती. सातारा जिल्हा पत्रकार संघाने हे शिवधनुष्य लिलया स्वीकारले होते. त्यासाठी गेल्या काही वर्षांत अनेक खस्ता खाल्ल्या. अनेक वर्षे जिल्हा पत्रकार भवन व्हावे यासाठी नुसत्या चर्चा झडत होत्या. प्रत्यक्ष जिल्हा पत्रकार भवन आकाराला येत नव्हते. मात्र, सातारा जिल्हा पत्रकार संघाने नेटाने प्रयत्न करुन अनेक अडचणी व समस्यांवर मात करत अखेर सातारा जिल्हा पत्रकार भवन साकारलेच. गोडोली येथील साईबाबा मंदिरापासून जवळ किल्ले अजिंक्यतारा रस्त्याला हे ‘सातारा जिल्हा पत्रकार भवन’ व साहित्य सदन साकारले असून बुधवारी सकाळी 11 वाजता त्याचे उद्घाटन होत आहे. त्यानंतर गोडोलीतील हॉटेल लेक व्ह्यूच्या संस्कृती लॉनजवळील सभागृहात मुख्य स्वप्नपूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम होणार आहे.
सातारा जिल्हा पत्रकार भवनाच्या उद्घाटनाला महाराष्ट्रातील कोणत्याही मोठ्या नेत्यांना बोलवता आले असते. मात्र, गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या राजकीय पर्यावरणात जी भेळमिसळ झाली आहे ती पाहता कार्यक्रम अराजकीय करण्याचा निर्णय घेण्यात आला. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज आहेत. सातारा जिल्हा पत्रकार भवन त्यांनीच दिले. त्यामुळे फक्त त्यांच्या अध्यक्षतेखाली हा अराजकीय कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचवेळी महाराष्ट्रातील पत्रकारांच्या हितासाठी अहोरात्र योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार व मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख, किरण नाईक यांच्याच हस्ते उद्घाटन व्हावे, असे ठरवून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या स्वप्नपूर्ती सोहळ्याला खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, एस. एम. देशमुख या मान्यवरांसह जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, टी. व्ही. जर्नालिस्ट असोसिएशन मुंबईचे अध्यक्ष विनोद जगदाळे, मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष शरद काटकर, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, सातार्याचे माजी उपनगराध्यक्ष अॅड. डी. जी. बनकर, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पालिकेचे नगरअभियंता दिलीप चिद्रे, डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांचीही या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य चंद्रसेन जाधव, गोरख तावरे, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे प्रसिध्दी प्रमुख दीपक शिंदे, परिषद प्रतिनिधी सुजित आंबेकर, उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर, तुषार भद्रे, पत्रकार हल्लाविरोधी समितीचे निमंत्रक राहुल तपासे, डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य उपाध्यक्ष सनी शिंदे, इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन साताराचे अध्यक्ष ओंकार कदम, सनियंत्रण समिती सदस्य तुषार तपासे, पत्रकार हल्लाविरोधी समितीचे समन्वयक शंकर मोहिते, मराठी पत्रकार परिषदेच्या महिला सरचिटणीस विद्या म्हासुर्णेकर व जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य, सातारा पत्रकार संघाचे सदस्य, सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यांसह विविध पत्रकार संघांचे पदाधिकारी सदस्य, इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजीटल मीडियाचे पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी 14 फेब्रुवारीच्या स्वप्नपूर्ती सोहळ्यात सामील व्हावे, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.
No comments