फलटण तालुक्याचा दुष्काळी कलंक पुसण्याचे काम श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले - श्रीमंत संजीवराजे
सभेत बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व्यासपीठावर मान्यवर. |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २५ : कायम दुष्काळी हा फलटण तालुक्याचा कलंक पुसण्यासाठी आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या सर्वांच्या साथीने केलेले प्रयत्न सर्वश्रुत असून, त्यामुळेच कृष्णेचे पाणी तालुक्याला किंबहुना राज्यातील संपूर्ण दुष्काळी पट्ट्याला मिळाले, व फलटण तालुक्याचा दुष्काळी कलंक पुसण्याचे काम झाले ही वस्तुस्थिती असून, त्यापैकीच नीरा - देवघर हा एक प्रकल्प असल्याचे स्पष्ट प्रतिपादन सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
चौधरवाडी, ता. फलटण येथे १ कोटी ७२ लाख ३८ हजार रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची उद्घाटने व भूमिपूजने आणि खो - खो मधील गुणवंत खेळाडू विद्यार्थिनींच्या सत्कार समारंभात विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष नितीन भैय्या भोसले, श्रीराम कारखाना संचालक उत्तमराव चौधरी, फलटण एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ सदस्या श्रीमती उषादेवी पांडुरंग भोसले, लोकनियुक्त सरपंच तुकाराम नामदेव कोकाटे, उप सरपंच रामदास मारुती भोसले व ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच सर्वश्री निवृत्ती कृष्णा शिंदे, मनोहर गोविंद गिरमे, धनसिंग माधवराव भोसले, सौ. विमल दत्तात्रय जगताप, श्रीराम सोसायटी संचालिका सौ. सोनाली शरद जाधव, हेमंत भोसले यांच्यासह चौधरवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ स्त्री - पुरुष, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी नीरा - देवघर पाटबंधारे प्रकल्पाची उभारणी तर केलीच पण सदर धरण ७५ % विश्वासार्हतेमध्ये बसत असल्याचे केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून देवून निधीची तरतूद करुन घेतल्याने खंडाळा, फलटण, माळशिरस तालुक्यात पाणी उपलब्ध झाल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
कृष्णेच्या पाण्याने दुष्काळी पट्टा ओलिताखाली येत असताना औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी कमिन्स सारखा मोठा प्रकल्प येथे आणून तालुक्याची औद्योगिक क्षेत्रातील घोडदौड गतिमान करण्यात आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यशस्वी झाल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
तालुक्यातील कृषी औद्योगिक विकासाबरोबर रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण वगैरे मूलभूत नागरी सुविधांच्या बाबतीतही आपण गेल्या ३० वर्षात कोठेही मागे राहिलो नाही, आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आ. दिपक चव्हाण यांच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना तर आपण स्वतः सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक योजना येथे राबविल्याने येथील नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा प्राधान्याने उपलब्ध झाल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
कृषी औद्योगिक क्षेत्रात विकासाच्या वाटेवर तालुका आघाडीवर नेत असताना शांततेच्या दृष्टीने या तालुक्याचे वेगळेपण जपण्याचा आपण सर्वांनीच नेहमी यशस्वी प्रयत्न केला, एकाद्या प्रश्नात वाद झाला तरी तो टोकाचा कधी झाला नाही, येथे निर्माण झालेला वाद थांबतो, मिटतो, संपतो अशी परिस्थिती होती, ती परिस्थिती, तेच वातावरण भविष्यात येथे राखणार की नाही हा खरा प्रश्न असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून देत त्यासाठी आपली एकजूट अखंडित ठेवण्याची आवश्यकता स्पष्ट केली.
गेल्या ५ वर्षात विशेषतः गेल्या वर्षभरापासून जो अनुभव येतोय तो चांगला नाही, एक विकृत प्रवृत्ती येथील राजकारणात येऊ पहातेय ती थांबविण्याचे काम आपल्याला आगामी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून करावे लागेल असे प्रतिपादन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी केले.
माढा लोकसभा निवडणुकीत कोण खासदार असावा यापेक्षा कोण नसावा याचा निर्णय करावा लागेल असे सांगून मागच्या वेळी जे घडले ते घडले, पण ते तालुक्याच्या आणि तुम्हा आम्हा सर्वांच्या हिताच्या दृष्टीने फारसे चांगले नसल्याने आता लोकसभा निवडणुकित योग्य निर्णय घ्यावा लागेल असे सांगताना यावेळी तसे काही घडेल असे वाटत नाही पण आपण जागरुक राहुन योग्य निर्णय केला पाहिजे असे मत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
प्रारंभी सरपंच तुकाराम कोकाटे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचे सत्कार केल्यानंतर प्रास्तविकात आज उद्घाटन व भूमिपूजन होत असलेल्या विकास कामांविषयी माहिती देताना ८७ लाख रुपये खर्चाच्या रस्ते खडीकरण, डांबरीकरण, दत्त मंदिर सभामंडप, बंदिस्त गटर वगैरे कामांची भूमिपूजने, ५९ लाख रुपये खर्चाच्या ८ रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण कामे पूर्ण झाली असून त्याचे उद्घाटन करण्यात आली. तसेच १५ व्या वित्त आयोग निधीतून २६ लाख ३८ हजार रुपये खर्चाच्या रस्ते, गटर, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन आणि प्रा. शाळा येथे पाण्याची टाकी आदी कामे करण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले.
प्रारंभी श्रीमंत संजीवराजे व मान्यवरांच्या हस्ते ग्रामदैवत मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर कार्यक्रम सुरु झाले. ग्रामपंचायत व अनेकांनी व्यक्तिगत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे पुष्पहार घालुन स्वागत केले.
No comments