Breaking News

ओबीसींच्या बाजूने उभे राहणार नाहीत, त्यांना मतदान करणार नाही - फलटणमध्ये ओबीसींचा इशारा

Won't stand for OBCs, won't vote for them - OBCs warn in Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  दि. ४ : ओबीसी आरक्षणासाठी कणखरपणे लढा देणाऱ्या ना. छगन भुजबळ व अन्य ओबीसी नेत्यांविषयी पातळी सोडून टीका करणाऱ्यांना,ओबीसी समाज त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. जे ओबीसींच्या बाजूने उभे राहणार नाहीत, त्यांना आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था, आमदार व खासदारकीच्या निवडणुकीत ओबीसी समाज कदापी मतदान करणार नाही असा इशारा आज फलटणमध्ये ओबीसी समाजाच्या वतीने देण्यात आला व मराठा समाज आरक्षण अधिसूचनेच्या विरोधात हरकतीचे निवेदन आ. दीपक चव्हाण, प्रांताधिकारी सचिन ढोले यांना देण्यात आले.

    सदर निवेदनामध्ये शिंदे सरकारने मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून बेकायदेशीर व अन्यायकारक पद्धतीने घेतलेल्या निर्णयास ओबीसी समाजाचा विरोध आहे. अधिसूचनेचा मसुदा रद्द करण्यात यावा, राज्य मागासवर्ग आयोग व न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करण्यात यावी तसेच चुकीच्या कार्यपद्धतीने व बेकायदेशीररित्या वितरित होणाऱ्या मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा प्रमाणपत्राचे वितरणाला स्थगिती देण्यात यावी यासह विविध हरकतींचे मुद्दे यांचा समावेश आहे. सदर निवेदन प्रांताधिकारी सचिन ढोले यांना देण्यात आले. यानंतर विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी आमदार दीपक चव्हाण यांना निवेदन देण्यात आले, तेव्हा ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळ आरक्षण देण्यात यावं अशी आमची सर्वांची भूमिका होती, त्याप्रमाणे आपण विधानसभेतही तशी मागणी केली होती. सरकारची व आमची आजही तीच भूमिका आहे. फलटण तालुक्यात आजवर सर्व धर्म, समाज यांच्यामध्ये सौदाहार्याचे वातावरण राहिले आहे. त्यामुळे कुणीही एकमेकांवर चिखलफेक न करता तालुक्यातील वातावरण बिघडू देऊ नका असे आवाहन आ. चव्हाण यांनी यावेळी केले. यानंतर खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निवसस्थानी अभिजीत नाईक निंबाळकर यांनी निवेदन स्वीकारले. यानंतर क्रांतीसिंह नाना पाटील चौक येथे ना. छगन भुजबळ यांच्या विषयी अनुद्गार काढल्या प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांचा निषेध व्यक्त करून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. तसेच सरकारने काढलेल्या अधिसूचनेची व संजय गायकवाड यांच्या प्रतिमेची जाहीर होळी करण्यात आली. त्याचबरोबर ज्या डीजेवर ना. छगन भुजबळ व अन्य ओबीसी नेत्यांवर टीकाटिप्पणी करणारी गाणी वाजविण्यात आली अशा डीजेंवर पोलीस कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आली.

No comments