कुस्त्यांची मैदाने शरीर बळकट व पीळदार बनविण्याची उर्मी निर्माण करतात - नारायण पाटील
पै. प्रवीण सरक व पै. सुरेश ठाकूर यांची कुस्ती लावताना नारायणआबा पाटील, चंद्रकांत जाधव, नानासो इवरे, राजेंद्र सुळ, बाळासो काशीद, स्वागत काशीद व अन्य |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : कुस्त्यांची मैदाने मुले व तरुणांमध्ये आपली शरीरयष्टी बळकट व पीळदार बनविण्याची उर्मी निर्माण करतात. समाजातील एक पिढी बलदंड झाली पाहिजे या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण येथे शिवसेनेच्यावतीने पिंटू तथा नानासो इवरे यांनी जंगी कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन करमाळ्याचे मा. आ. नारायणआबा पाटील यांनी केले.
फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायसकूलच्या पटांगणावर सोमवार दि. १२ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती लावताना ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, शिवसेना फलटण तालुका प्रमुख पिंटू तथा नानासो इवरे, श्रीराम एज्युकेशनचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी-बेडके, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका शारदा जाधव, उपजिल्हा प्रमुख अविनाश फडतरे आदींसह स्थानिक पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
यावेळी सुमारे एकशेवीस पेक्षा जास्त निकाली कुस्त्या झाल्या. पहिल्या क्रमांकाची कुस्ती कोळकी येथील स्वराज तालीम केंद्राचा मल्ल पै. प्रवीण सरक व सांगली येथील पै. सुरेश ठाकूर यांच्यात झाली. अटीतटीच्या या कुस्तीत सरक याने ठाकुरला पोकळ घिस्सा डावावर चितपट केले. यावेळी उपमहाराष्ट्र केसरी आबा सुळ यांनी पंच म्हणून काम पाहिले. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत कोळकी येथील स्वराज तालीम केंद्राच्या पै. विकास धोत्रे याने सांगलीच्या पै. बाळू अपराधवर एकलंघी डावावर मात केली. तृतीय क्रमांकाच्या कुस्तीत सोमंथळीच्या पै. गणेश सोडमिसे याने सांगलीच्या प्रदीप ठाकुरला घिस्सा डावावर आस्मान दाखविले.
पै. संदेश बिचुकले विरुद्ध पै. अविनाश गावडे यांच्यात झालेल्या नेत्रदीपक कुस्तीत बिचुकले याने आकडी डावावर गावडे याच्यावर मात केली. यावेळी तालुक्यातही महिला कुस्तीगीरांनीही मैदानावर हजेरी लावत लक्षणीय कुस्त्या केल्या.
या मैदानाचे अभ्यासपूर्ण समालोचन प्रा. पै. अजय कदम यांनी केले. यावेळी महाराष्ट्र केसरी पै. गोरख सरक, उपमहाराष्ट्र केसरी चंद्रकांत सुळ, आबा सुळ, वस्ताद पै. बाळासाहेब काशीद यांचेही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. पंच म्हणून महाराष्ट्र चॅम्पियन जयदीप गायकवाड, राहुल सरक, राजेंद्र सुळ आदींनी काम पाहिले.
कुस्त्यांचे मैदान पाहण्यासाठी फलटणसह अन्य तालुक्यातील कुस्ती प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments