उमेदवार बदला! हा उमेदवार नको! , 4 - 8 दिवस थांबा! निर्णय जाहीर करू - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२२ - उमेदवारीचा फॉर्म भरण्यास अजूनही वेळ आहे चार ते आठ दिवस थांबा, मी आपली भूमिका नेते अजित पवार यांच्या समोर मांडणार आहे, उमेदवार बदला! आम्हाला हा उमेदवार नको! संजीवराजे यांना उमेदवारी द्या किंवा दुसऱ्या कोणालाही उमेदवारी दिली तरी आमचे काही म्हणणे नसल्याचे माझी विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांच्या पुढे स्पष्ट केले.
माढा लोकसभा मतदारसंघातील समविचारी नेते व कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच मी निर्णय घेणार असल्याचे, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी जाहीर केल्यानंतर, फलटण येथील अनंत मंगल कार्यालय येथे नेते व कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा घेऊन श्रीमंत रामराजे यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या, त्याप्रसंगी श्रीमंत रामराजे बोलत होते.
या मेळाव्यास आ. दीपक चव्हाण, माजी आ. प्रभाकर घार्गे, राष्टवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर,श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर,पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर,मनोज पोळ, सुरेंद्र गुदगे, बाळासाहेब सोळस्कर,अनिल देसाई, शिवरुपराजे खर्डेकर, नंदकुमार मोरे आदी उपस्थित होते.
माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप महायुतीने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली असून, महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस हा घटक पक्ष असून देखील आमच्या नेतृत्वाला विचारात घेतले गेले नाही. त्यामुळे आमचा खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना तीव्र विरोध असून, भाजपाने उमेदवार बदलून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना किंवा दुसऱ्या कोणालापण उमेदवारी द्यावी, हे जमत नसेल तर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून तुतारी हाती घ्यावी अशी जोरदार आग्रही मागणी सर्व कार्यकर्त्यांनी जाहीर मेळाव्यात केली.
यावर बोलताना आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सर्वांच्या भावना जाणून घेण्यासाठीच हा मेळावा आयोजित केलेला आहे, मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत, आपणाला युती धर्म पाळण्यास सांगण्यात आले. यावर आपण खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारी संदर्भात कार्यकर्त्यांची चर्चा करून निर्णय घेतो असे स्पष्ट सांगितले होते. तिकीट देण्यापूर्वी आपण खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला आपला विरोध आहे हे जाहीर केले होते. पण तरीसुद्धा त्यांना उमेदवारी भाजपने दिली आहे. यावर भाजप बद्दल आपण काही बोलणार नाही. मात्र आपले नेते अजितदादा पवार यांची भेट घेऊन, आज कार्यकर्त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या, त्या त्यांच्या पुढे मांडणार असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असल्या तरी ही निवडणूक आपली शेवटची निवडणूक नाही अजून बऱ्याच निवडणुका येणार असून त्याचा पण विचार करून काय करायचे हे मला ठरवून द्या. आताचे खासदार हे सुडाचे राजकारण करत असून त्यांना प्रशासन साथ देत आहे त्यांचे बोलणे वागणे हे वेगळा थाटातले आहे. कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहे त्यांना आपली गरज नसल्यागत त्यांचे वागणे सुरू असून या गोष्टी आपण पक्षश्रेष्ठींना सांगणार असल्याचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले. आम्ही केलेल्या कामाचे श्रेय विद्यमान खासदार घेत असून, निरा देवघर, धोम बलकवडीसाठी रात्री तीन तीन वाजेपर्यंत, मी नदी खोऱ्यात फिरलो आहे, तसेच पालखी महामार्गासह इतर अन्य कामात देखील माझे योगदान आहे आणि विद्यमान खासदार मात्र या कामाचे स्वतः श्रेय घेत आहेत.
हा फक्त फलटणचा प्रश्न नसून, माण, खटाव, माळशिरस, करमाळा या भागातील देखील प्रश्न आहे, कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असल्या तरी भावनेच्या भरात आजच्या आज निर्णय न घेता कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ घेऊन येत्या चार ते आठ दिवसात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्या कानावर घालणार असून,उमेदवार बदलाची मागणी करणार असल्याचे सांगताना श्रीमंत रामराजे यांनी, जर उमेदवार बदलला नाही आणि मतदान कमी झाले तर त्याला आम्ही जबाबदार नाही हे सुद्धा आम्ही स्पष्ट करणार आहोत.
माणचे आ. जयकुमार गोरे यांना तर संपूर्ण जिल्हा त्यांचा मालकीचा असल्यागत वाटते तसे त्यांचे वागणे असून चुकीच्या माणसांच्या हातात सत्त्ता जाता कामा नये. आत्ताचे उमेदवार त्यांचे ऐकत असून आपण एव्हढी वर्षे मंत्री होतो सभापती होतो मात्र सत्तेचा माज कधी चढू दिला नाही.कार्यकर्त्यांनी सबुरीने घ्यावे.थोडे दिवस थांबा.आपल्या मनासारखे नाही झाले तर बघुया काय करायचे असे आ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
No comments