Breaking News

दुग्ध व्यवसायामध्ये महिलांचे योगदान महत्त्वाचे - श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर

Contribution of women in dairy industry is important - Srimant Shivanjaliraje Naik Nimbalkar

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ - मुक्त संचार गोठ्यामुळे आज महिलांचे काम बरेच कमी झाले आहे. त्यांना दररोज शेण काढावे लागत होते, पाणी पाजावे लागत होते, परंतु आता मुक्त संचार गोठ्यामुळे, ही सगळी कामे कमी झालेली आहेत.  त्यामुळे हा शेणाचा व्यवसाय राहिला नसून, एक प्रतिष्ठित व्यवसाय झाला आहे व माझ्या महिला माता-भगिनींचे काम या मुक्त संचार गोठ्यामुळे बरेचसे कमी झालेले आहे. तसेच भृणप्रत्यारोपण सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च वंशावळच्या गाई तयार करण्यामध्ये सुद्धा महिलांचे योगदान असून, आज जवळजवळ साडेसात हजार कालवडी या उच्च गुणवत्तेच्या वीरमात्रांपासून तयार झालेले असून, या आपल्या वातावरणामध्ये टिकणाऱ्या व आजारांना कमी बळी पडून,  जास्त दूध देणाऱ्या कालवडी निर्माण झाल्या आहेत, यामुळे दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. फलटण परिसर हा महाराष्ट्राला चांगल्या गुणवत्तेच्या गाई पुरवण्याचे काम काही दिवसात नक्कीच करेल, इतक्या उच्च गुणवत्तेच्या कालवडी या भागात आज तयार झालेल्या आहेत व यामध्ये महिलाही फार अग्रेसर असून त्यांची भूमिका सुद्धा फार महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद मा. सदस्या व गोविंद डेअरीच्या संचालिका श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी मुंजवडी येथील सौ. स्वाती विजय पवार यांच्या जीवन संजीवनी आदर्श गोठ्यास (समवेदना डेअरी फार्म व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण केंद्र) भेट दिली, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी श्रीमंत शिवांजलीराजे यांनी विविध योजनांची माहिती घेतली व मार्गदर्शनही केले. 

पुढे बोलताना, श्रीमंत शिवांजलीराजे म्हणाल्या, माझ्या माता-भगिनींना दररोज रानातून चारा कापून आणायला लागत होता आणि हे फार कष्टाचे काम आहे, परंतु गोविंद डेअरीने सातत्याने मुरघास तंत्रज्ञान गावोगावी पोहोचवल्यामुळे, आज महिलांचे रोजच्या रोज चारा कापून आणण्याबाबतचे  बरेचसे काम कमी झालेले आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादन तर वाढलेच आहे व दूध व्यवसाय ही फायदेशीर होण्यास मदत झालेली आहे.

ग्रीन गोविंद बायोगॅस सयंत्र योजना महिलांसाठी फार लाभकारी ठरत आहे. आज या योजनेमार्फत ९० टक्के अनुदानावर जवळजवळ साडेपाच हजार बायोगॅस गोविंद डेअरी मार्फत पशुपालकांना देण्यात आल्या असून, त्यामुळे महिलांना चुलीपुढे धुरात काम करण्याची, गरज राहिलेली नाही, त्या त्या बायोगॅसमार्फत कमी खर्चामध्ये त्यांना इंधन उपलब्ध होत असून, चांगल्या गुणवत्तेचे खतही या बायोगॅस मधून मिळत असल्यामुळे बऱ्याच महिला या योजनेमुळे सुखी झाले आंबेत. आज बऱ्याच महिला दुग्ध व्यवसायामध्ये अग्रेसर असून त्या आपला गोठा स्वतंत्रपणे सांभाळत असल्याचे श्रीमंत शिवांजलीराजे यांनी सांगितले.

श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी सौ. स्वाती विजय पवार यांच्या जीवन संजीवनी आदर्श गोठ्यास भेट दिली त्याप्रसंगी स्वाती पवार  यांच्या कामाचे कौतुक केले, तसेच सर्व महिलांना, जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

सौ. स्वाती विजय पवार या  ४० गाईंचा फार्म स्वतः सांभाळत असून, ३५ ते ४५ लिटरच्या गाई त्यांनी त्यांच्या गोठ्यात  भ्रूण प्रत्यारोपण सारख्या टेक्नॉलॉजीचा वापर करून तयार  केल्या आहेत. त्या आपला गोठा सांभाळून आपले प्रशिक्षण केंद्रही चालवत आहेत. त्यांनी हजारो महिलांना दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण दिले आहे. 

No comments