आ. प्रणिती शिंदे व आ. राम सातपुते यांच्यात लेटर युद्ध
सोलापूर: भाजपनं सोलापूरमध्ये उमेदवार बदलला आहे. विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या जागी भाजपनं राम सातपुते यांना संधी दिली आहे. सातपुते सोलापूरच्या माळशिरसचे आमदार आहेत. सातपुतेंना उमेदवारी जाहीर होताच महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या उमेदवार आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी ट्विटरवर एक पत्र पोस्ट करत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात त्यांचं स्वागत केलं. शिंदेंनी सातपुतेंना टोलाही लगावला.
'सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा असून इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते. मग तो इथला असो किंवा बाहेरचा, सोलापूरची लेक म्हणून मी तुमचं सोलापुरात स्वागत करते,' अशा शब्दात प्रणिती शिंदे यांनी सातपुते यांना चिमटा काढला. सातपुते मूळचे बीडचे आहेत. त्यामुळे ते 'बाहेरचे' असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न शिंदेंनी केला. त्यांच्या पत्राला सातपुतेंनी पत्रातूनच उत्तर दिलं आहे. त्यामुळे दोन उमेदवारांमध्ये लेटरवॉर सुरू झालं आहे.
'मी २०१९ पासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय. मी आमदार झाल्यापासून ते आजतोवर मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या आणि त्यायोगे सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत माझ्या परीनं प्रामाणिकपणे होईल तेवढी विकासकामे करण्याचा प्रयत्न केलाय,' अशा शब्दांमध्ये आपण २०१९ पासून सोलापूरचेच असल्याचं सातपुतेंनी स्पष्ट केलं आहे.
No comments