मोबाईल चोरणाऱ्या टोळीस फलटण शहर पोलीसांकडून अटक ; १२ मोबाईल जप्त
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२४ - मोबाईल हँडसेट चोरणाऱ्या टोळीला फलटण शहर पोलिसांनी जेरबंद करून, त्यांच्याकडून अंदाजे एकुण रु.३,०२,५००/- किंमतीचे चोरलेले १२ मोबाईल फोन आणि सदर टोळीने गुन्हा करताना वापरलेली दुचाकी अॅक्टीव्हा ४ जी हे वाहन जप्त केले आहे. दरम्यान या अनुषंगाने सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की, मोबाईल फोन चोरीस गेल्यास किंवा हरविल्यास, त्याबाबत नजिकच्या पोलीस ठाण्यात तात्काळ माहिती द्यावी. अशा मोबाईल फोनचा शोध घेण्यास तांत्रिक सहाय्य देण्यासाठी भारत सरकारच्या संचार मंत्रालयांतर्गत असलेल्या दूरसंचार विभागाने https://www.ccir.gov.in ही वेबसाईट सुरु केली असुन, त्याव्दारे हरविलेले किंवा चोरीस गेलेले मोबाईल फोन शोधण्यासाठी उपयुक्त माहिती पोलीसांना दिली जाते.
मागील आठवड्यात फलटण स्थित लोकप्रिय प्रसिध्दी माध्यमांचे पत्रकार तसेच पत्रकारांचे स्नेही यांनी पोलीस ठाण्यास येऊन माहिती दिली होती की, फलटण शहरात मोबाईल फोन चोरीच्या घटना घडत आहेत. अनेक लोक अशा चोरीबाबत तक्रार करीत नाहीत. परंतु अशा घटना घडत असल्याचे त्यांनी खात्रीने सांगितले.
या पार्श्वभूमीवर दि.२१/०३/२०२४ रोजी डेक्कन चौक, फलटण येथे श्री युसुफ मन्सुर महात, वय ५२ वर्षे, रा. कोळकी, फलटण हे चालत जात असताना, तीन अनोळखी आरोपींनी दुचाकीवर येऊन, त्यांचा मोबाईल फोन जबरदस्तीने काढुन घेऊन गेले. या अनुषंगाने फलटण शहर पोलीस ठाणे येथे गु.नॉ.क्र.१५२/२०२४, कलम ३९२, ३४ भा.दं.सं. प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास सपोनि. नितीन शिंदे यांच्याकडे देण्यात आला.
वरील माहितीच्या आधारे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल धस यांनी फलटण शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सपोनि. नितीन शिंदे आणि त्यांच्या पथकास मोबाईल फोन चोरीच्या घटनांबाबत आढावा घेऊन, चोरांचा शोध घेण्याच्या सुचना देण्यात आल्या.
या माहितीच्या आधारे फलटण शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पथकाने केलेल्या कौशल्यपूर्ण आरोपी नामे (१) निलेश अनिल जाधव, वय २१ वर्षे, (२) निखील तुकाराम गदाई, वय १९ वर्षे, (३) मंगेश संजय गंगावणे, वय २१ वर्षे, तिघे रा. सोमवार पेठ, फलटण यांना अटक करण्यात आली. या आरोपींना दि.२२/०३/२०२४ रोजी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने दि.२४/०३/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सदर आरोपींकडून अंदाजे एकुण रु.३,०२,५००/- किंमतीचे चोरलेले १२ मोबाईल फोन आणि सदर चोरांच्या टोळीने गुन्हा करताना वापरलेली दुचाकी अॅक्टीव्हा ४ जी हे वाहन जप्त केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. नितीन शिदे, स.पो. फौ. संतोष कदम, पो.ह. चद्रकांत धापते, सचिन पोशि. सचिन पाटोळे, काकासो कर्णे, जितेंद्र टिके, स्वप्नील खराडे यांनी केली.
No comments