Breaking News

फलटण आरटीओ कार्यालयाचे खा.रणजितसिंह व आ.जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

Phaltan RTO office was inaugurated by Mr. Ranjitsinh and A. Jayakumar Gore

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१४ - उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, फलटण जि. सातारा या नुतन कार्यालयाचे उद्घाटन  खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते शुक्रवार दिनांक १५ मार्च २०२४ रोजी दुपारी २ वाजता, शिंगणापूर रोड जुने मुलींचे वस्तीगृह, शिवाजीनगर, फलटण येथे करण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे नेते उत्तमराव जानकर, प्रल्हादराव साळुंखे पाटील,  धनंजयदादा साळुंखे पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी सातारा विनोद चव्हाण उपस्थित होते.

    फलटण येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय व यासोबतच साखरवाडी येथे अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्यासाठी आपल्याला यश आले आहे. यामधील अतिरिक्त सत्र न्यायालय व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हे सुरू झाले आहेत. इतर सर्व मंजुरी ही येणाऱ्या काही दिवसांमध्ये येत असून ही कामे सुद्धा मार्गी लागली असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

    फलटण येथे मंजूर करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला एमएच ५३ असा नंबर मंजूर आहे. परंतु सर्व फलटणकरांच्या इच्छेचा आदर ठेवत एम एच ५६ ची मागणी आपण परिवहन खात्याकडे केलेली आहे. तोपर्यंत एम एच ११ च्या अंतर्गतच फलटण येथे सर्व कामकाज चालणार असल्याचे खासदार रणजितसिंह यांनी सांगितले.

    ३० वर्षापासून फलटण शहरासह तालुक्याचा जो विकास रखडला होता. तो पुन्हा सुरू करण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना यश आलेले आहे. फलटण तालुक्याचे जे प्रलंबित प्रश्न होते ते सर्व खासदारांचे यांनी सोडवले असून येणाऱ्या काळात फलटणचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे आमदार जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितले. 

    कार्यक्रमाच्या सुरवातीस प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्रादेशिक परिवहन विभागातर्फे करण्यात आले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रादेशिक परिवहन अधिकारी सातारा विनोद चव्हाण यांनी केले.

No comments