Breaking News

मुधोजी महाविद्यालयाच्या मराठी विभागाची दैनिक गंधावार्ता कार्यालयास अभ्यास भेट

Study visit to Dainik Gandhawarta office of Marathi Department of Mudhoji College

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.११ - मुधोजी महाविद्यालय, फलटणच्या पदवी व पदव्युत्तर मराठी विभागाने  "मराठी भाषा विशेष सप्ताह"या निमित्त "क्षेत्रीय भेट अभ्यास सहल", आयोजित केली होती. या अभ्यास सहल  अंतर्गत "गंधवार्ता प्रेस' व "दैनिक गंधावार्ता वृतपत्र" या प्रकाशन संस्थेची निवड केली होती. या भेटीदरम्यान मराठी विषयाचे अध्ययन करणाऱ्या ३५ विद्यार्थी- विद्यार्थिनींनी या वृत्तपत्र संस्थेमार्फत फलटण शहर, तालुका, सातारा जिल्हा,महाराष्ट्रात रोज जाणाऱ्या गंधवार्ता वृतपत्र तसेच वार्षिक दिवाळी अंक, गंधवार्ता विशेषांक याविषयी माहिती घेतली. दैनिक गंधवार्ता हे वृत्तपत्र  गेली ३७ वर्षे अखंडपणे सुरू असून, समाजात प्रबोधन,परिवर्तन व मार्गदर्शन करणारे ठरले आहे. 

यावेळी दैनिक गंधवार्ताचे संपादक अँड. रोहित आहिवळे यांनी प्रकाशन व्यवसायात येणाऱ्या अनेक अडचणी सांगितल्या. संपादकीय लेखन, बातम्या तयार करणे, कॉम्प्युटरवर पेज सेटिंग, छपाई, कागद, कामगार, वितरण, प्रवास, आर्थिक समस्या व लोकांच्या हातात वृतपत्र जाईपर्यंत, कित्येक राबणारे हात याची कैफियत ऐकून सर्व विध्यार्थी अवाक झाले. दैनिक गंधवार्ताने आजपर्यंत सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक धार्मिक, शैक्षणिक व बौद्धिक समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रत्यक्ष व्यवसाय करत असताना चिकाटी सातत्य व संयम याची गरज असल्याचे सांगितले. 

याप्रसंगी वृत्तपत्र व्यवसायाविषयी दैनिक गंधवार्ता संस्थेचे संस्थापक  संपादक शामराव अहिवळे यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. सर्व माहिती फोटो निशी घेतल्यानंतर सर्व अभ्यासक विद्यार्थी- विद्यार्थिनींना ऐतिहासिक भूमी डॉ.आंबेडकर स्मृती स्मारक शेरी,मंगळवार पेठ  येथे अल्पोपहार देण्यात आला. या अभ्यास सहलीत  मिळालेल्या अनोख्या माहितीमुळे विध्यार्थी - विद्यार्थिनींच्यात  प्रकाशन व्यवसायाबद्दल मिळालेल्या माहितीमुळे  कुतूहल व समाधान दिसत होते, या सहलीचे संयोजन पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर पवार व सहसंयोजक प्रा.शैला क्षीरसागर यांनी केले होते.शेवटी  प्राचार्य डॉ. पी.एच.कदम यांच्या हस्ते दैनिक गंधवार्ता संस्थापक संपादक शामराव अहिवळे यांना आभार पत्र देऊन  समारोप झाला.

No comments