मोबाईल चोरीला गेल्यास किंवा हरविल्यास काय करावे?
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२५ - मोबाईल फोन चोरीस गेल्यास किंवा हरविल्यास, त्याबाबत नजिकच्या पोलीस ठाण्यात तात्काळ माहिती द्यावी असे आवाहन फलटण शहर पोलीस ठाण्याकडून करण्यात आले आहे. चोरीला गेलेल्या किंवा हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यास तांत्रिक सहाय्य देण्यासाठी भारत सरकारच्या संचार मंत्रालयांतर्गत असलेल्या दूरसंचार विभागाने https://www.ccir.gov.in ही वेबसाईट सुरु केली असुन, त्याव्दारे हरविलेले किंवा चोरीस गेलेले मोबाईल फोन शोधण्यासाठी उपयुक्त माहिती पोलीसांना दिली जाते.
हरविलेल्या किंवा चोरीस गेलेल्या मोबाईल फोन बाबतची तक्रार पोलीस ठाण्यास केल्यावर, त्यात असलेल्या मोबाईल फोन नंबरचे नवीन सिम कार्ड घ्यावे. त्यानंतर हरविलेल्या / चोरीस गेलेल्या मोबाईल फोन आणि तक्रारीची माहिती वरील वेबसाईट मध्ये असलेल्या Request for blocking lost/stolen mobile या शिर्षकाखाली असलेल्या नमुन्यात माहिती भरावी. सदर माहिती भरल्यावर, हरविलेला किंवा चोरीस गेलेला फोन जेंव्हा अॅक्टीवेट केला जातो, तेंव्हा त्याची माहिती संबंधीत पोलीस ठाण्यास दिली जाते व त्या मोबाईल फोन चा शोध लागतो. या संबंधाने अधिक माहिती हवी असल्यास किंवा काही शंका असल्यास क्रमांक १४४२२ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.
दूरसंचार विभागाने असेही आवाहन केले आहे की, Know Your Mobile (KYM) हे आवश्यक असुन, मोबाईल फोनवर *#06# असे डायल केलेवर स्क्रीनवर त्या मोबाईल फोनचा १५ अंकी IMEI नंबर दिसतो. सदरचा नंबर हा वरील तक्रारमध्ये अत्यावश्यक असतो. हा IMEI नंबर मोबाईल फोनची पावती व मोबाईल फोनच्या बॅटरी च्या ठिकाणीही लिहीलेला असतो. आपण विकत घेत असलेल्या मोबाईल फोनवरुन १४४२२ या क्रमांकावर KYM 15 आकडी अंकी IMEI नंबर मेसेज करुन पाठविल्यास, Black-listed, duplicate किंवा already in use असा मेसेज आल्यास, असे फोन विकत घेऊ नयेत आणि त्याबाबत नजीकच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी असे फलटण शहर पोलीस स्टेशन कडून कळवण्यात आले आहे.
No comments