घेतला वसा टाकणार नाही..! - सुनेत्रा अजित पवार
बारामती (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ - तुम्हा सर्वांचे आशीर्वाद, पाठबळ आणि सदिच्छा सोबत घेऊन बारामती लोकसभा मतदार संघातून महायुतीची अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज दखल करण्याची प्रक्रिया काहींसाठी कदाचित काही कागदपत्रांचा पार पाडलेला उपचार असू शकतो. माझ्यासाठी मात्र बारामती लोकसभा मतदार संघाच्या सर्वशक्तिनिशी करायच्या विकासाचा घेतलेला वसा आहे असे प्रतिपादन सोशल मीडियाच्या माध्यमातून सुनेत्र पवार यांनी केले.
हा घेतला वसा कदापि टाकणार नाही. राज्य आणि केंद्र शासनाचा दुवा होऊन, जनसंपर्काच्या माध्यमातून विकासाला गतिमान करण्यासाठी माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आता माझ्या मतदार संघासाठी देईन आणि माझ्या देहाचा प्रत्येक कण हा मतदार संघाच्या विकासासाठीच झिजविन, ही खूणगाठ यावेळी पुन्हा एकदा मनाशी घट्ट बांधली असल्याचे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी तर आपल्या पुणे जिल्ह्यातीलच पुणे, शिरूर, मावळ या लोकसभा मतदार संघासाठी मतदान पुढच्या टप्प्यात १३ मे रोजी होत आहे. त्यामुळे त्या मतदारसंघातील आपल्या महायुतीच्या ३ उमेदवारांचे अर्ज नंतर दखल करण्यात येणार आहेत. त्या अर्थाने पुण्यात आज फक्त बारामती लोकसभा मतदारसंघातीलच उमेदवारी अर्ज दाखल होताना अफाट पाठिंब्याची जनसागराची लाट उसळली. आजच्याच दिवशी जर महायुतीच्या पुण्यातील इतरही तीन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असते तर पुणे शहरात जनसगराची त्सुनामी आली असती. त्यामुळे जनतेच्या या प्रचंड प्रेमाने मी कृतार्थ झाले आहे. आपणा सर्वांची मी कृतज्ञ असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
No comments