Breaking News

४० वर्षे ज्यांनी जिल्ह्याचे नेतृत्व केले त्यांनीच दुष्काळी भागात पाणी पोहचू दिले नाही - देवेंद्र फडणवीस

Why didn't water come to the drought-stricken areas of Satara and Solapur districts? - Devendra Fadnavis

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.18 -  ४० वर्षे ज्यांनी जिल्ह्याचे  नेतृत्व केले. त्यांनी सातारा व सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागात पाणी पोहचविले नाही, त्यासाठी नरेंद्र मोदी यांनाच  यावे लागले.  ४० वर्षे ज्यांनी जिल्ह्याचे  नेतृत्व केले. त्यांनी केवळ स्वप्न दाखवली. मात्र, ती स्वप्नं आम्ही प्रत्यक्षात साकार केली. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सातत्याने कामाचा पाठपुरावा केला व विरोधकांच्या  तावडीतून प्रलंबित कामे सोडवली  त्यामुळे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व राम सातपुते यांना विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी केले.

    माढा लोकसभा मतदार संघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तर सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनीही मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास उमेदवारी अर्ज दाखल केले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस बोलत होते. याप्रसंगी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार राम सातपुते,  आमदार बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, आमदार शहाजी बापू, आमदार जयकुमार गोरे, आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार राजन पाटील उपस्थित होते.

    ही निवडणूक ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभेची नाही, तर देशाचा पंतप्रधान निवडण्याची आहे. निंबाळकर - मोहिते पाटील अथवा सातपुते-शिंदे यांच्यातील ही लढाई नाही. ही लढाई राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी आहे. त्यामुळे विकासाच्या गाडीचे पॉवरफुल इंजिन असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनविण्यासाठी पुन्हा एकदा महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन देवेंद्र  फडणवीस यांनी केले.

    देवेंद्र  फडणवीस म्हणाले, मोदी हे देशाचा विकास करू शकतात. त्यांनी देशातील गरिबांसाठी विविध योजना राबविल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या पाठीशी कोट्यवधी लाभार्थींचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे एकत्र आलेले विरोधक त्यांच्या काहीही वाकडे करू शकणार नाहीत. त्यांनी देशातील भ्रष्टाचार संपवल्याने देशात विकास कामांना निधी मिळत आहे. 

    यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा माढा लोकसभा मतदारसंघाचा उर्वरित विकास करण्यासाठी भाजपने आपणास संधी दिली आहे. तर महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी त्यास पाठिंबा दिला आहे. अजूनही आपणासमोर सामर्थ्यवान उमेदवार नसल्याचे सांगत १९ तारखेपर्यंत सामर्थ्यवान उमेदवार आला नाही तर आपली निवडणूक एकतर्फी होणार असल्याचा विश्वास यावेळी खासदार रणजितसिंह यांनी बोलून दाखविला.

No comments