बहीण - भावाच्या दुहेरी खुन प्रकरणाचा तपास १० तासात करून पोलिसांनी आरोपीस केले जेरबंद
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२५ - फलटण तालुक्यातील निंभोरे गावाच्या हद्दीत पालखी महामार्गावरील उड्डाणपूला शेजारी सख्ख्या बहिण भावाचा खून झाल्याने फलटण तालुक्यात खळबळ माजली होती. मात्र फलटण ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत आरोपीस दहा तासात जेरबंद केले.
फलटण ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पालखी महामार्गालगत सुमित तुकाराम शिंदे वय २० वर्ष व शीतल तुकाराम शिंदे उर्फ शीतल रणजित फाळके वय ३५ वर्ष दोघे रा. सुंदरनगर, निंभोरे, ता. फलटण यांचे मृतदेह रस्त्याचे कडेला मिळुन आल्यावर लागलीच पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, दोघांच्या छातीवर धारदार व टोकदार भोकसल्यामुळे, त्यातुन रक्तस्त्राव झाल्याचे दिसुन आले. सदर घटनेतील दोन्ही मृत व्यक्ती हे नात्याने सख्खे बहीणभाऊ आहेत, त्या दोघांचे खुन अज्ञात व्यक्तीने केला म्हणुन फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, गु. र. नं. ५२०/२०२४, भा. दं. सं. कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, आँचाल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांनी अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. सातारा, सुनिल महाडीक पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली तपास पथके तयार करुन, मार्गदर्शन करुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या.
निंभोरे, ता. फलटण हे गाव पुणे-पंढरपूर पालखीमहामार्गालगत असुन सदर घटनेचे ठिकाण देखिल सदर महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ आहे. घटनास्थळावर काहीही धागेधोरे नसताना, पोलीसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरु केल्यानंतर असे निष्पन्न झाले की, मयत स्त्री शीतल तुकाराम शिंदे उर्फ शीतल रणजित फाळके हीने दोन वर्षापूर्वी तिचा पहिला नवरा कनवऱ्या भिमऱ्या पवार रा. वाळवा, जि. सांगली यास सोडुन देऊन, रणजित मोहन फाळके, मुळगाव सातारारोड, ता. कोरेगाव, जि. सातारा याचेबरोबर तिच्या आईवडीलांजवळ झोपडीमध्ये राहत होती. सदरची घटना घडलेल्या रात्री सुद्धा रणजित मोहन फाळके हा तिच्यासोबत झोपडीमध्ये झोपला होता. परंतु दोघांचे मृतदेह मिळुन आल्यानंतर त्याने तेथुन पलायन केले होते. पोलीसांनी त्यास सातारारोड, ता. कोरेगाव येथुन ताब्यात घेऊन त्याचेकडे विचारपुस केली असता, त्याने सुरुवातीला दिशाभुल करणारी माहिती सांगितली. परंतु पोलीसीखाक्या दाखवताच त्याने दि. २५/०५/२०२४ रोजी मध्यरात्रीचे सुमारास शीतल ही झोपेतून उठुन परपुरुषाबरोबर कोठेतरी जात असल्याचे दिसल्यामुळे, तो झोपडीतील चाकु घेऊन तिच्या मागोमाग गेला. काही अंतरावर गेल्यानंतर त्याने शीतलला गाठुन तिच्या छातीवर चाकु खुपसुन तिचा खुन केला. त्यावेळी तिच्यासोबत असलेला तिचा भाऊ सुमित तुकाराम शिंदे यास त्याने अंधारात न ओळखल्यामुळे त्याने तो परपुरुष आहे, असे समजुन त्याने त्याच्याही छातीत चाकु खुपसुन त्याचाही निघृण खून केला आहे. आरोपी रणजित मोहन फाळके, वय ४५ वर्ष यास अटक केली आहे. तपासामध्ये मयत बहीणभाऊ हे 'अनुसुचित जमाती या प्रवर्गातील असल्याचे व आरोपी रणजित मोहन फाळके हा 'खुल्या' प्रवर्गातील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अॅट्रॉसिटी कायद्यातील कलमांची वाढ केली आहे.
श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांचे मार्गदर्शनाखाली श्री अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थागुशा सातारा, श्री सुनिल महाडीक पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण, सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट, अशोक हुलगे, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, मच्छिंद्र पाटील, गोपाल बदने, पोलीस अंमलदार मोहन हांगे, पांडुरंग हजारे, बबन साबळे, महादेव पिसे, संतोष सपकाळ, प्रविण फडतरे, अजित कर्णे, अरुन पाटील, शिवाजी मिसे, अमित माने, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, ओंकार यादव, मोहन पवार, रोहित निकम, विशाल पवार, वैभव सावंत, केतन शिंदे, शिवाजी गुरव, अमृत कर्पे, वैभव सूर्यवंशी, नितीन चतुरे, संदीप मदने, अमोल जगदाळे, विक्रम बनकर, श्रीनाथ कदम, अमोल पवार, संजय देशमुख, अमोल देशमुख, संभाजी साळुंखे, विक्रम कुंभार, हनुमंत दडस, रशिदा पठाण, प्रिती काकडे, उर्मिला पेंदाम, भाग्यश्री सुरुम, श्रीकांत खरात, अरुधंती कर्णे, शिवराज जाधव सदरची कारवाई केली आहे. गुन्ह्याचा प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांनी केला असुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे करीत आहेत.
No comments