फलटण येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात ; बाईक रॅलीत युवक - युवतींचा उत्स्फूर्त सहभाग
मिरवणुकीचा शुभारंभ प्रसंगी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, पांडुरंग गुंजवटे व इतर (छाया - योगायोग, फोटो ) |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पारंपारिक जयंती निमित्त फलटण तालुका शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने पारंपारिक वाद्यसह भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीचा शुभारंभ विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मिरवणुकीत विविध चित्ररथामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आकर्षक प्रतीकृती व देखावे केल्यामुळे नागरिकांनी मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली होती.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उभारण्यात आलेला आकर्षक देखावा (छाया - योगायोग, फोटो ) |
मिरवणुकीमध्ये दिव्यांची आरास, झांज पथक, तसेच ढोल ताशा पथक आशा पारंपारिक वाद्यांचा सहभाग करण्यात आला होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला, सर्व वातावरण शिवमय झाले होते. मिरवणुकीचा शुभारंभ श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या पुतळ्यापासून करण्यात आला. मिरवणूक फलटण शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आल्यानंतर मिरवणूक विसर्जित करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शहरातून काढण्यात आलेली बाईक रॅली (छाया - योगायोग, फोटो ) |
फलटण तालुका शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने फलटण शहरातून आज सकाळी बाईक रॅली काढण्यात आली. बाईक रॅलीचा शुभारंभ श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या बाईक रॅलीमध्ये युवक - युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. शहरातील प्रमुख मार्गावरून बाईक रॅली शांततेत व शिस्तबद्धरीत्या संपन्न झाली.
No comments