सरपंच आणि ग्रामसेवक या दोघात समन्वय व सकारात्मक भूमिका असेल तर भारत महाशक्ती होईल - भास्करराव पेरे पाटील
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१९ - सरपंच आणि ग्रामसेवक गावच्या ग्रामपंचायती मधील महत्वाचे घटक असुन गावचा विकास याच दोन घटकांवर अवलंबुन असतो त्यामुळे या दोघांमध्ये योग्य समन्वय, सकारात्मक विचार, प्रामाणिक काम करण्याची इच्छाशक्ती असेल तर भारत महासत्ता होवु शकतो असा विश्वास भास्करराव पेरे पाटील यांनी व्यक्त केला.
श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृति महोत्सवात आयोजित कार्यक्रमात "ग्रामविकासाचा आदर्श " या विषयावर पेरे पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीराम सह . साखर कारखान्याचे चेअरमन डॉ . बाळासाहेब शेंडे होते. याप्रसंगी श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठानचे सचिव माजी प्राचार्य विश्वासराव देशमुख , माजी प्राचार्य अरविंद निकम , डी.के. पवार , शिवाजीराव घोरपडे , राजीव नाईक निंबाळकर , अर्जुन रूपनवर , उपस्थित होते.
पुढे बोलताना भास्करराव पेरे पाटील म्हणाले, राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने पिण्याचे स्वच्छ पाणी, फळांची झाडे लावणे, स्वच्छता, संस्कारी शिक्षण आणि ज्येष्ठांचा सांभाळ करणे या पाच गोष्टी केल्या पाहिजेत, पाऊस गरजेपेक्षा जास्त पडतो, मात्र पडलेल्या पावसाच्या पाण्याचे नियोजन योग्य रितीने केले जात नाही, राज्यकर्ते फक्त राजकारण करतात व समाज भोळा असल्याने विकासकामे दिसुन येत नाहीत, विकास खराच करायचा असेल तर प्रत्येकांनाचे झोकुन देवुन काम केले पाहिजे अलिकडे प्रत्येक क्षेत्रात घूसखोरी वाढत असल्याची खंत पेरे पाटील यांनी व्यक्त केली.
झाडे हे पावसाचे एटीएम आहे, देशात स्वच्छता नाही, राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतीची गटारे , संडास उघड्यावर आहेत, चारशे वर्षापुर्वी छत्रपती शिवाजीराजेंनी शौचालयाचा वापर केला होता, म्हणजे शौचालय संकल्पना चारशे वर्षापुर्वीची आहे. गावातील मुलां- मुलींना संस्कारी शिक्षण दयावे, चांगल्या गोष्टी समाजाला सांगा, शेतकरी जगण्यासाठी मदत करा , कचरा प्रत्येक घरातुन गोळा करा, असे विविध सल्ले पेरे पाटील यांनी दिले.
ज्याप्रमाणे राष्ट्र विकास व निर्मितीसाठी महापुरुषांनी त्रास घेतला, त्याप्रमाणे ग्रामस्थानी त्रास घ्यावा, आजपर्यंत राज्यात सात हजार आमदार झाले मात्र यातील सात गांवही चांगली नाहीत, मग राज्यकर्ते काय करीत होते असा सवाल करीत सर्वोच्च न्यायालयही ग्रामपंचायतीचे अधिकार तोडू शकले नाही. एवढे चांगले अधिकार ग्रामपंचायतींना आहेत तुमचे निर्णय तुम्ही घ्या, गोरगरीबांसाठी चांगलं काम करा, गरीबांचं जगणं सुकर करा , महापुरूषांचे स्वप्न साकार करा अशी विनंती पेरे पाटील यांनी सरकारला केली आहे.
कार्यक्रमाची सुरुवात राजघराण्यातील व्यक्तींच्या प्रतिमांना अभिवादन व स्वागत गिताने करण्यात करण्यात आली स्वागत व प्रास्ताविक डॉ . प्रा . संजय दिक्षीत यांनी केले सुत्रसंचालन प्रा . निलम देशमुख यांनी केले.
कार्यक्रमास फलटण एज्युकेशन सोसायटी , मालोजीराजे प्रतिष्ठान पदाधिकारी ग्रामीण भागातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच . , उपसरपंच , ग्राम सदस्य , ग्रामसेवक , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments