फलटणची पत्रकारिता आदर्श निर्माण करेल - अरुण भोईटे ; राज्यस्तरीय 'दर्पण पुरस्कार' प्राप्त पत्रकार रोहित अहिवळे व यशवंत खलाटे यांचा सत्कार
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१९ - दैनिक गंधवार्ताचे कार्यकारी संपादक ॲड.रोहित अहिवळे व दैनिक पुण्यनगरीचे फलटण तालुका प्रतिनिधी यशवंत खलाटे-पाटील या दोन वरिष्ठ युवा पत्रकारांना मिळालेला राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार त्यांच्या पत्रकारितेतील भावी कारकीर्दीसाठी ऊर्जा आणि प्रेरणा देणार असून, भविष्यात पत्रकारिता क्षेत्रात येणाऱ्या नवीन पत्रकारांसमोर या दोघांची पत्रकारिता आदर्श निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक अरुण भोईटे यांनी केले.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक 'दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय 'दर्पण पुरस्कार' ॲड.रोहित अहिवळे व यशवंत खलाटे-पाटील यांना जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे फलटण तालुकाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव, प्राचार्य रवींद्र येवले, प्राचार्य अर्जुन रुपनवर, राजेंद्र जाधव, श्री.भोसले, राजेंद्र लिपारे, दिलीप रसाळ, महेश अहिवळे, ऋषिकेश आढाव आदी उपस्थित होते.
प्रा.आढाव म्हणाले, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बेडकीहाळ यांनी फलटण तालुक्यातील दोन वरिष्ठ युवा पत्रकारांना पुरस्कार देवून त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील कामाची दखल घेतली आहे. बेडकिहाळ यांनी पहिल्यापासूनच राज्यातील छोट्या-मोठ्या पत्रकारांना संस्थेच्यावतीने सन्मानित केले आहे, हे ऋण पुरस्कारप्राप्त पत्रकार कदापि विसरणार नाहीत असे सांगत ॲड.अहिवळे व खलाटे-पाटील या पत्रकारांनी आगामी काळात स्व.हरिभाऊ निंबाळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करावे अशी अपेक्षा प्रा.आढाव यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, ॲड.रोहित अहिवळे व यशवंत खलाटे-पाटील यांचा ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव व अरुण भोईटे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
No comments