आमदार जितेंद्र आव्हाड यांचा फलटण येथे जाहीर निषेध
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.३० - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांचा फलटण येथे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, शिवसेना (शिंदे गट) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आझाद समाज पार्टी, कामगार संघर्ष संघटना यांच्या वतीने जाहीर निषेध करून आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
फलटणचे प्रांत अधिकारी सचिन ढोले यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिनांक २९/५/२०२४ रोजी महाड येथे मनुस्मृतीची प्रत फाडत असताना, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सुद्धा फोटो फाडून, आपण सुद्धा मनुस्मृतीची औलाद आहोत, हे समस्त दलित बांधव व महाराष्ट्रातील सर्व जनतेला दाखवून दिले आहे. तरी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर सर्व दलित बांधवांच्या भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून, त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, शिवसेना (शिंदे गट) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आझाद समाज पार्टी कामगार संघर्ष संघटना यांच्या वतीने करण्यात येत आहे व सध्या चर्चेत असलेल्या मनुस्मृतीचा अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकांमध्ये घेण्यात येऊ नये, अन्यथा संपूर्ण देशभर या संदर्भात तीव्र आंदोलने करण्यात येतील व होणाऱ्या परिणामास राज्य शासन जबाबदार राहील याची प्रशासनाने काळजीपूर्वक दखल घ्यावी.
No comments