निरा उजवा कालव्याचे राहिलेले सिंचन आवर्तन पुन्हा चालू करावे ; सांगोला, पंढरपूर, माळशिरस, फलटण तालुक्यातील नेत्यांचे निवेदन
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२५ - फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर तालुक्यातील निरा उजवा कालव्याचे उन्हाळा हंगामाचे सिंचन चालू असताना अचानकपणे शनिवार दिनांक ११/०५/२०२४ रोजी कालवा बंद केल्यामुळे फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर तालुक्यातील लाभधारक शेतक-यांचे सिंचन अपूर्ण राहिलेले आहे, त्यामुळे शेतक-यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झालेला आहे, तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस असून पाणी टंचाई तीव्र प्रमाणात जाणवत आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे लवकरात लवकर निरा उजवा कालव्याचे राहिलेले सिंचन आवर्तन पुन्हा चालू करणेबाबत सिंचन भवन पुणे येथे सांगोला पंढरपूर माळशिरस पंढरपूर फलटण तालुक्यातील नेत्यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना निवेदन दिले.
यावेळेस फलटणचे आ.दिपक चव्हाण,धैर्यशिल मोहिते-पाटील,उत्तमराव जानकर,डाॅ.बाबासाहेब देशमुख,बाबाराजे देशमुख,मामासाहेब पांढरे,पांडूरंग वाघमोडे,माणिक वाघमोडे,दादाराजे घाडगे,माऊली पाटील दत्तात्रय टापरे,सोमनाथ पिसे,रावसाहेब पांढरे,संतोष वाघमोडे किरण पवार,राजेंद्र गायकवाड,सुरेश बर्गे,वसंतराव अडसुळ व इतर मान्यवर उपस्थित होते.
निरा उजवा कालवा सल्लागार समितीच्या उन्हाळा हंगामाच्या बैठकीमध्ये मंजूर झालेला पाणी कोठा लाभधारक शेतक-यांना पूर्ण मिळालेला नाही. तसेच २० मे पर्यंत कालवा चालू ठेवण्याचे धोरण कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये ठरले होते त्या पूर्वीच सिंचन आवर्तन बंद करण्यात आले. त्यामुळे शेतक-यांचे हक्काचे सुमारे १.२५ टी.एम.सी. पाणी शिल्लक असताना लाभधारक शेतक-यांना सदरचे पाणी न मिळाल्यामुळे शेतक-यांची उभी पिके धोक्यात आली असून शेतक-यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे.त्या नुकसानीस जलसंपदा विभाग पूर्णपणे जबाबदार राहील असे यावेळेस नेत्यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या संचालकांना सांगितले.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार व इतर हवामान विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार जुन महिन्यांमध्ये धरण क्षेत्रात भरपुर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला असून जुन महिन्यात पडणा-या पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणंद, ता. फलटण येथे दिनांक ६ जुलै २०२४ रोजी येणार असून पालखीसाठी राखीव ठेवलेले ०.८५ टी.एम.सी. पाणी साठा हा शिल्लक आहे.
लाभधारक शेतक-यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हक्काचे शिल्लक पाणी कोठा अंदाजे १.२५ टी.एम.सी. व पालखीसाठी राखीव ठेवण्यात आलेले ०.८५ टी.एम.सी. पाणी सोडल्यास निरा उजवा कालव्याचे राहिलेले आवर्तन पुंन्हा सुरु करता येईल. तसेच उध्दट बॅरेज मधील सध्या शिल्लक असणारे पाणी निरा नदीला सोडल्यास नदी वरील पिण्याच्या पाण्याच्या योजना, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागून नदी काठच्या शेतक-यांना त्याचा लाभ होणार आहे.
तरी उपरोक्त हक्काचे शिल्लक पाणी कोठा अंदाजे १.२५ टी.एम.सी. व पालखीसाठी राखीव ठेवण्यात आलेले ०.८५ टी.एम.सी. पाणी सोडून निरा उजवा कालव्याचे राहिलेले आवर्तन पुंन्हा सुरु करावे व उध्दत बॅरेज मधील शिल्लक असणारे पाणी निरा नदीला सोडण्यात यावे अशी मागणी केली.
Post Comment
No comments