फलटण शहर व तालुक्यातील फ्लेक्स, टॉवर, होर्डिंग्ज यांचे सर्वेक्षण करा : मागणी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ - फलटण शहर व तालुक्यातून जाणाऱ्या राज्य व राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेले तसेच अनेकांनी आपल्या दुकानावर, घरावर, सार्वजनिक इमारतींवर लावलेले फ्लेक्स, मोबाईल टॉवर्स धोकादायक नाहीत याची खात्री करण्यासाठी प्रशासनाने तातडीने त्याचे सर्वेक्षण करावे अशी मागणी होत आहे.
घाटकोपर, मुंबई येथील होर्डिंग कोसळून १४ जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली असल्याच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर व तालुक्यातील फ्लेक्स, मोबाईल टॉवर्स, होर्डिंग यांचे प्रशासनाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्वेक्षण करावे, अथवा या क्षेत्रातील तज्ञ संस्थेची नियुक्ती करुन सर्वेक्षण करण्याची आवश्यकता असल्याचे अनेकांचे मत आहे.
घाटकोपर सारखी दुर्घटना यापूर्वी पुण्यात घडली आहे, तशीच फलटण तालुक्यात घडू शकते. वेळीच प्रशासनाने जागरुकतेची भूमिका घेण्याची मागणी जनतेतून होत आहे.
फलटण शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेने व्यावसायिकांनी होर्डींग, फ्लेक्स लावले असून सध्या अवकाळी पावसाचे दिवस सुरु झाले असल्याने जोरात वारे वाहत आहेत, तसेच अचानक सुसाट वाऱ्यासह पाऊस कोसळत असून यामुळे अनेक ठिकाणचे फ्लेक्स, साईन बोर्ड उडून गेल्याची घटना यापूर्वी घडलेली आहे.
तसेच मागील वर्षी फलटण शहरातील एका पेट्रोल पंपाचे छतच उडून गेले होते. सुदैवाने त्यावेळी कोणतीही जीवित हानी झाली नव्हती. मात्र हानी होण्याची वाट बघण्यापेक्षा फलटण तालुक्यातील प्रशासनाने रस्त्याच्या कडेने लावलेली होर्डिंग, बॅनर तसेच अनेक इमारतीवर लावण्यात आलेले होर्डिंग याची पाहणी करुन त्याचे ऑडिट करणे गरजेचे आहे. अनेकांनी परवानगी न घेता रस्त्याच्या कडेने होर्डिंग, बॅनर लावले असून काहींनी फलटण शहरात फ्लेक्स, बॅनर लावण्यास निर्बंध असल्याने त्यातून मार्ग काढून शहरालगत फलटण ते बारामती, फलटण ते लोणंद, फलटण ते पंढरपूर, फलटण ते सातारा, फलटण ते शिंगणापूर, फलटण ते आसू वगैरे मुख्य रस्त्याला चिकटून मोठ मोठाले होर्डिंग उभे केले आहेत. हे उभे करताना संबंधीत ग्रामपंचायतीची किंवा प्रशासनाची कसलीही परवानगी घेतलेली नाही ज्याच्या जागेत उभे केले आहे, त्याला भाडे देऊन बॅनरबाजी सुरु आहे. अचानक वारा सुटल्यास होर्डिंग जर पडले तर मोठी दुर्घटना होऊ शकते.
फलटण शहरात सुद्धा अनेक मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, सराफी व्यावसायिकांनी दुकानाबाहेर मोठमोठाले फ्लेक्स, बोर्ड लावले असून सुसाट वाऱ्यात ते उडून जाऊ शकतात. प्रशासन व फलटण नगरपालिकेने याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे.
त्याचप्रमाणे फलटण शहर व तालुक्यात काही पेट्रोल पंपाच्या इथे सुद्धा मोठमोठाली होर्डिंग साईन बोर्ड असून ते हटवण्याची तसेच पेट्रोल पंपावरील छत सुस्थितीत आहे का नाही हे तपासण्याची मागणी वाहन धारकांकडून होत आहे. नगरपालिकेने याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे.
No comments